श्रीनगरच्या हजरतबाल भागात गुरुवारी झालेल्या गोळीबारात लष्कर-ए-तैयबाचा एक पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला असून, पळून गेलेल्या दोन दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या ३ दहशतवाद्यांनी प्रसिद्ध दाल लेकनजीकच्या हजरतबाल दग्र्याजवळ तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांजवळील शस्त्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यापैकी एक पाकिस्तानी दहशतवादी होता. त्याने पोलीस पथकावर गोळीबार केला असता त्यांनी त्याचे प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात हा दहशतवादी मारला गेला, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दर्गा परिसराबाहेर पत्रकारांना सांगितले.
मारला गेलेल्या दहशतवाद्याचे नाव मंझूर ऊर्फ हैदर ऊर्फ हमझा असे आहे. तो बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा संघटनेशी संलग्न होता. लष्कर व टीआरएफ यांचा उच्चपदस्थ कमांडर मेहरान याचा तो साथीदार होता. त्याची हत्या हे सुरक्षा दलांचे मोठे यश आहे, असे कुमार म्हणाले. मंझूर हा गेल्या ६ महिन्यांपासून श्रीनगरमध्ये सक्रिय होता. अनेक हत्यांमध्ये त्याचा हात होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याबाबत बोलणाऱ्या मंझूरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.