पाकिस्तानात सोमवारी तब्बल २२ तास वीज नव्हती. मंगळवारीदेखील याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. देशातल्या ६० टक्के भागात कसाबसा वीजपुरवठा सुरळीत झाला. खरंतर देशावरच्या या संकटाचं खापर तिथल्या शाहबाज शरीफ सरकारवर फुटायला हवं होतं. परंतु पाकिस्तानसह भारतातले काही लोक यासाठी नुकताच प्रदर्शित झालेला बॉलिवूड चित्रपट ‘मिशन मजनू’मधील प्रमुख अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला जबाबदार ठरवू लागले आहेत.
सोशल मीडियावर पाकिस्तानी आणि काही भारतीय नेटीझन्स जे मिम्स शेअर करत आहेत त्यामध्ये असं म्हटलं जात आहे की, पाकिस्तानमधील न्यूक्लियर प्लान्ट उडवणं हे ‘मिशन मजनू’चं मुख्य ध्येय होतं. परंतु त्याने चुकून इलेक्ट्रिसिटी ग्रिड प्लांट उडवला आहे.
मिशन मजनूची गोष्ट काय?
मिशन मजनू हा चित्रपट रॉच्या (RAW) एका हेरावर आधारित आहे. तो पाकिस्तानमधील न्यूक्लियर प्लांटची माहिती भारताला देतो. या चित्रपटात सस्पेन्स आणि थ्रील दोन्ही पाहायला मिळेल. काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, ही गोष्ट सत्य घटनेवर आधारित आहे.
हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच भारतासह पाकिस्तानमध्ये या चित्रपटाची चर्चा सुरू होती. २० जानेवारी रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. ‘मिशन मजनू’ या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. रश्मिका मंदाना, परमीत सेठी, शरीब हाश्मी आणि कुमूद मिश्रा या चित्रपटात प्रमूख भूमिकेत आहेत. शंतनू बाग्ची यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
पाकिस्तानमधील बत्ती गुल होण्यामागचं कारण काय?
पाकिस्तानमधील नागरिक सोमवारी सकाळी झोपेतून जागे झाले तेव्हा लोकांना कळलं की, पाकिस्तानमधलं नॅशनल इलेक्ट्रिक ग्रिड फेल झालं आहे. अशी घटना तिथे पहिल्यांदाच झालेली नाही. पाकिस्तानमध्ये अशी घटना यापूर्वी अनेकदा घडली आहे. परंतु गंमत म्हणून लोक सोशल मीडियावर मिम्स शेअर करत आहेत आणि बती गुल होण्यास ‘मिशन मजनू’मधल्या सिद्धार्थ मल्होत्राला जबाबदार ठरवत आहेत.