पाकिस्तानामध्ये वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. देशात विशेषत: कराचीमध्ये औषधं, किराणा माल आणि विजेचे दर गगनाला भिडले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांवर कुठलंही नियंत्रण नसल्यानं पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि पीएमएलएनच्या( PML-N) नेत्या मरियम नवाझ यांच्यावर जनतेकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याच मुद्द्यावर पाकिस्तानातील एका महिलेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. “मुलांना खाऊ घालू की नको? की त्यांचा जीव घेऊ?” असा उद्विग्न सवाल या व्हिडीओत कराचीतील एका महिलेनं केला आहे. ‘द न्यूज इंटरनॅशनल’नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
कराचीच्या राबिया या गृहिणीचा व्हिडीओ पाकिस्तानी पत्रकार हामिद मीर यांनी शेअर केला आहे. महागाई वाढल्यानं सामना करावा लागत असलेल्या आर्थिक समस्यांबाबत बोलताना राबिया यात रडताना दिसत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने घरखर्च कसा चालवावा, असा सवाल राबियाने या व्हिडीओत केला आहे.
Black Magic Comment: असलं काही बोलून पंतप्रधानपदाची पातळी घसरवू नका, राहुल गांधींचा मोदींवर हल्ला
“घराचं भाडं भरावं, वाढीव विजबील भरावं, दुध खरेदी करावं की मुलांसाठी औषधं…मी नेमकं काय करावं?” असा सवाल या महिलेनं या व्हिडीओत केला आहे. राबियाला दोन मुलं आहेत. त्यातील एकाला फिट्स येतात. या रोगावरील औषधांच्या किमतींमध्ये पाकिस्तानात गेल्या चार महिन्यात कमालीची वाढ झाली आहे. यामुळे “मी माझ्या मुलांसाठी औषधं खरेदी करणं टाळू का?” असा संतप्त सवाल राबियाने पाक सरकारला केला आहे. महागाईमुळे गरीब जनतेचं जगणं कठीण झालं आहे. गरीबांचे असे हाल करणाऱ्या या सरकारला अल्लाहची थोडीही भीती वाटत नाही का? असेही राबियानं पुढे म्हटले आहे.
राबियाचे हे आरोप पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफताह इस्माईल यांनी फेटाळले आहे. देशाची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे इस्माईल यांनी म्हटले आहे. सरकारने विजेच्या अथवा औषधांच्या दरांमध्ये कुठलीही वाढ केलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भारत सरकार दोन लाख सैन्य कपात करण्याच्या तयारीत; ‘हे’ आहे कारण
पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. देशातील राजकीय अस्थिरतेमुळे महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे आर्थिक संकट दूर करण्यासाठी विदयमान सरकारच्या निर्णयक्षमतेवर जनतेकडून शंका निर्माण केली जात आहे. पाकिस्तानी नागरिक आपल्या आर्थिक समस्या सध्या समाजमाध्यमांवर मांडताना दिसत आहेत. देशातील जनतेला दिलासा देण्यासाठी पंतप्रधान काहीच करत नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे.