पाकिस्तानी नागरिकांना पासपोर्ट काढणं कठीण झालं आहे. कारण परदेशी जाण्यासाठी लागणारं पासपोर्टच नागरिकांना मिळणं मुश्किल झालंय. यामुळे परदेशात विविध कारणांसाठी जाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, दि एक्स्प्रेस ट्रिब्युनच्या हवाल्याने इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पासपोर्टसाठी लॅमिनेशन पेपर महत्त्वाचं साहित्य आहे. हा कागद फ्रान्समधून मागवला जातो. परंतु, देशभर लॅमिनेशन पेपरचा तुटवडा निर्माण झालाय, अशी माहिती पाकिस्तानचे इमिग्रेशन आणि पासपोर्टचे विभागाचे महासंचालकांनी दिली.
परदेशी शिक्षण किंवा नोकरीसाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. काही विद्यार्थ्यांनी युके, इटलीमधील विविध विद्यापीठात शिक्षणासाठी प्रवेश अर्ज केले आहे. परंतु, वेळेत पासपोर्ट मिळत नसल्याने ते तिथे जाऊ शकत नाहीयत. सरकारच्या या अनास्थेमुळे त्यांना किंमत मोजावी लागत असल्याची प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी दिली.
याप्रकरणी पाकिस्तान सरकारकडून प्रयत्न केले जात असून ही परिस्थिती लवकरच अटोक्यात आणली जाईल, अशी माहिती गृहमंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी कादिर यार तिवाना यांनी दिली.
अमिर नावाच्या एका व्यक्तीचा पासपोर्ट तयार असल्याचा मेसेज त्याला ऑक्टोबरमध्ये प्राप्त झाला होता. पासपोर्ट घेण्याकरता तो कार्यालयात गेला असता त्याला कळलं की त्याचा पासपोर्ट अद्यापही आलेला नाही. मोहम्मद इम्रान यांनाही सप्टेंबरमध्ये पुढच्या आठवड्यात पासपोर्ट येईल, असं आश्वासित करण्यात आलं होतं. परंतु, त्यानंतर अनेक आठवडे गेले तरीही पासपोर्ट मिळालेला नाही. दररोज ३ ते ४ हजार पासपोर्टची प्रक्रिया केली जायची, परंतु आता ही संख्या आता अवघ्या १२ ते १३ वर पोहोचली आहे.