पाकिस्तानचे माजी लष्करशाह परवेझ मुशर्रफ यांच्या परदेशवारीवरील र्निबध उठवणारा सिंध उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने फिरवला असून, आता त्यांना पुन्हा देशाबाहेर जाता येणार नाही.
मुशर्रफ यांना १२ जून रोजी सिंध उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात मुशर्रफ यांना १५ दिवसांत आमच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले नाही तर परदेशात जाण्याची मुभा दिली होती.
मुशर्रफ एकमेव आरोपी
दरम्यान, सोमवारी पाच सदस्यांच्या न्यायपीठाने न्या. नसीरउल मुल्क यांच्या नेतृत्वाखाली मुशर्रफ यांचे नाव प्रवास निषिद्ध यादीत कायम ठेवण्याची सरकारची याचिका स्वीकारताना सिंध उच्च न्यायालयाने त्यांना दिलेली परदेश प्रवासाची परवानगी रद्दबातल केली. राजद्रोहाच्या आरोपातील मुशर्रफ हे एकमेव आरोपी असून त्यांच्याविरुद्ध इतर न्यायालयांतही खटले प्रलंबित आहेत, त्यामुळे त्यांचे नाव परदेश प्रवास निषिद्ध यादीतून काढू नये असे सरकारने न्यायालयाला सांगितले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याचिकेचा अंतिम निकाल होईपर्यंत मुशर्रफ यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी देणारा सिंध उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला.
राजद्रोहाचा खटला
मुशर्रफ हे गेल्या वर्षी मार्चमध्ये पाकिस्तानात परत आले होते व त्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहासह अनेक खटले भरण्यात आले. २००७ मध्ये घटनाच रद्दबातल करून आणीबाणी लागू केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो खूनप्रकरण, नवाब अकबर बुगती खून, लाल मशिदीचा धर्मगुरू अब्दुल रशीद गाझी यांच्या खूनप्रकरणातही आरोप आहेत.
दरम्यान, मुशर्रफ यांना पुन्हा एकदा परदेशात जाण्याची अनुमती नाकारण्यात आल्यामुळे त्यांच्यासमोरील पेच वाढला असून मुशर्रफ आता कोणती पावले टाकतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा