मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफीझ सईद याची जमात-उद-दवा (जेयूडी) आणि तिची धर्मदाय शाखा फलाह-इ-इन्सानियत फाऊंडेशन (एफआयएफ) या संघटनांवर  बंदी घातल्याची पाकिस्तानची दोन आठवडय़ांपूर्वीची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दोन्ही संघटनांवर बंदी घालण्यात आलेली नसून त्यांच्यावर ‘लक्ष’ ठेवण्यात येत असल्याचे पाकिस्तानने सोमवारी जारी केलेल्या यादीवरून स्पष्ट झाले. पाकिस्तानी सरकारचे लक्ष असलेल्या संघटनांच्या यादीत या दोन्ही संघटनांचा समावेश आहे. पाकिस्तान सरकारच्या नॅशनल काऊंटर टेररिझम ऑथॉरिटी  या सुरक्षा यंत्रणेच्या सोमवारी अद्ययावत केलेल्या संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

‘ग्रे लिस्ट’मधून आपल्याला वगळावे म्हणून पाकिस्तानने काय प्रयत्न केले, हे तपासणाऱ्या फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सपुढे हा मुद्दा आणला जाण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी जूनमध्ये पाकिस्तानचा समावेश ‘ग्रे लिस्ट’मध्ये करण्यात आला होता.

पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत जेयूडी आणि एफआयएफ या संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदन पाकिस्तानने २१ फेब्रुवारीला जारी केले होते.

बंदी नव्हे, ‘लक्ष’

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दहशतवाद प्रतिबंधक प्राधिकरणाने सोमवारी जारी केलेल्या लक्ष ठेवण्यात आलेल्या संघटनांच्या यादीत जेयूडी आणि एफआयएफ या अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. मात्र बंदी घातलेल्या संघटनांच्या वेगळ्या श्रेणीत त्यांचा उल्लेख नाही. प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर बंदी घालण्यात आलेल्या ६८ आणि देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या चार संघटनांचे तपशील आहेत.