पाकिस्तान नॅशनल असेंब्लीच्या समितीची सूचना
आंतरराष्ट्रीय समुदायाचे समज दूर करण्यासाठी पाकिस्तानने काश्मिरी दहशतवादी गटांना पाठिंबा न देता हल्ल्यात सामील असलेल्या गटांवर कारवाई करावी, अशी सूचना पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या समितीने तेथील सरकारला केली आहे.
काश्मीरबाबत चार पानांची धोरण पत्रिकाच परराष्ट्र कामकाजविषयक समितीने सरकारला सादर केल्याचे एक्स्प्रेस ट्रिब्यूनचे वृत्त आहे. पाकिस्तानने काश्मीरमधील सशस्त्र, प्रतिबंधित गटांना पाठिंबा देऊ नये असे त्यात म्हटले आहे. पाकिस्तानने त्यांच्या भूमीतून भारताविरोधात केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखाव्यात यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दडपण वाढले आहे. पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटाचे सदस्य अवैस अहमद लेघारी यांनी सरकारपुढे असा प्रस्ताव मांडला की, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करीत नसल्याबाबत चिंता व्यक्त होते आहे तो समज दूर करण्यासाठी हिंसक व सशस्त्र दहशतवादी गटांवर कारवाई करावी. भारताबाबत पाकिस्तानचे धोरण चार तत्त्वांवर आधारित असावे असे सांगून समितीने म्हटले आहे की, महत्त्वाच्या मुद्दय़ांवर पाकिस्तानने भारताशी र्सवकष संवाद सुरू ठेवावा. काश्मीर, पाणी, व्यापार, संस्कृती व दळणवळण या मुद्दय़ावर भारताला वाटाघाटीत गुंतवून ठेवावे.
काश्मीरविषयी समितीने म्हटले आहे की, पाकिस्तानने काश्मीर प्रश्न सोडवण्याचा आग्रह कायम ठेवावा. काश्मीरमधील गटांना नैतिक व राजनैतिक पाठबळ द्यावे. आंतरराष्ट्रीय पाणी वाटप करारांचे मुद्दे वारंवार मांडावेत, व्यापारातील नियंत्रणे हटवण्यास भारताला भाग पाडावे, व्हिसा नियंत्रणे कमी करावीत, अनौपचारिक व्यापार नियंत्रित करावा अशा सूचनाही समितीने केल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा