भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव याला अटक केल्यानंतर तो बलुचिस्तान प्रांतातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली देत असलेली ध्वनीचित्रफित पाकिस्तानने प्रसारित केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. भारताने पाकिस्तानच्या आरोपाचे खंडन केले आहे.
भारताच्या इशाऱ्यावरून जाधव हेरगिरी करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला असून त्याचे खंडन करताना भारताने, जाधवचे इराणमधून अपहरण करण्यात आल्याची शक्यात वर्तवली आहे.
पाकिस्तान लष्कराच्या आयएसपीआरचे प्रमुख लेफ्ट. जन. असिम बाजवा आणि पाकिस्तानचे माहितीमंत्री परवेझ रशीद यांनी एका पत्रकार परिषदेत ध्वनीचित्रफित प्रसारित केली. बलुचिस्तानमध्ये दहशतवादाला चिथावणी देण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉसाठी काम करीत असल्याची कबुली माजी अधिकारी कुलभूषण जाधव याने दिल्याचा दावा पाकिस्तानने पत्रकार परिषदेत केला. जाधव याला पाकिस्तानात अलीकडेच अटक करण्यात आली असून भारतीय नौदलातील अधिकारी असल्याचा दावा पाकिस्तानने केला. त्याने नौदलातून निवृत्ती स्वीकारल्याचे भारताने स्पष्ट करूनही जाधव हा नौदलात असल्याचा आणि तो २०२२ मध्ये निवृत्त होणार असल्याचा दावा पाकिस्तानने केला. या कथित कबुलीजबाबाचे भारताने खंडन केले आहे.
कुलभूषण जाधवची ध्वनीचित्रफित सादर केल्याचा पाकचा दावा
असिम बाजवा आणि पाकिस्तानचे माहितीमंत्री परवेझ रशीद यांनी एका पत्रकार परिषदेत ध्वनीचित्रफित प्रसारित केली
First published on: 30-03-2016 at 01:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistans spy video raises questions jadhavs india trail offers clues