पाकिस्तानातील मध्यवर्ती सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या आदिवासी भागात आजही अल-कायदाचे जागतिक पातळीवरील दहशतवादाचे प्रमुख केंद्र आहे, असे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेतील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानातील याच आदिवासी क्षेत्रात अल-कायदाचे नेतृत्व करणारा समूह असून त्यांचे वर्चस्व कमी झाले असले तरी त्याचा समूळ नायनाट झालेला नाही, असे राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणचे संचालक जेम्स क्लॅपर यांनी म्हटले आहे.
या सर्व बाबींचा विचार करता हाच भाग अल-कायदाचे प्रमुख केंद्र असले, तरी सध्या ते कारवाईचे प्रमुख केंद्र नाही. अल-कायदाप्रमुख ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये खात्मा करण्यात आला. लादेन याच्यानंतर संघटनेची सूत्रे हाती असलेल्या आयमन अल-जवाहिरी याचा ठावठिकाणा अद्याप कळला नसला, तरी तो पाकिस्तानातच दडून बसला असल्याची माहिती मिळत आहे, असेही क्लॅपर म्हणाले.
‘हक्कानी नेटवर्क’ या अफगाणिस्तानस्थित दहशतवादी संघटनेला मिळणाऱ्या आर्थिक पाठबळाबाबत चर्चा करण्यास क्लॅपर यांनी नकार दिला. मात्र गुप्तचर यंत्रणांनी ‘हक्कानी नेटवर्क’ला पाठबळ देणाऱ्या आर्थिक स्रोतांचा त्याचप्रमाणे बँकांचा आणि व्यवसायांचा छडा लावला असल्याचे ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा