मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्यासोबत जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित राहणाऱ्या पॅलेस्टाईनच्या राजदूतांना मायेदशात परत बोलावण्यात आले आहे. पॅलेस्टिनी राजदूत वालिद अबू अली हे रावळपिंडी येथे हाफिज सईदसोबतच्या कार्यक्रमाला एकाच मंचावर उपस्थित होते. पाकिस्तानी पत्रकार ओमार कुरेशी यांनी ही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर भारताने पॅलेस्टिनी सरकारकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. भारताने डोळे वटारल्यानंतर काहीवेळातच पॅलेस्टाईनने आपल्या राजदूतांना माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला. पॅलेस्टाईनचे भारतातील राजदूत अदनान अबू अल हैजा यांनी ही माहिती दिली. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या पाकिस्तानमधील राजदूतांना हाफीज सईद कोण आहे, ते माहिती नव्हते. त्यांनी हाफीज सईदनंतर भाषण केले आणि त्यानंतर ते लगेचच निघून गेले. मात्र, आम्ही ही छोटीशी चूकदेखील खपवून घेणार नाही. त्यासाठीच आम्ही आमच्या पाकिस्तानातील राजदूतांना परत बोलविण्याचा निर्णय घेतल्याचे अदनान अबू अल हैजा यांनी सांगितले.

आम्ही भारत सरकार आणि त्यांच्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या लढ्याच्या पूर्णपणे बाजूने आहोत. आता पॅलेस्टिनी सरकारनेच थेट वालिद अबू अली यांना परत बोलविण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना या पदावर राहता येणार नाही. याशिवाय, अदनान अबू अल हैजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. पंतप्रधान मोदी लवकरच पॅलेस्टाईनला भेट देतील, अशी आशा आम्ही करतो. त्यांचे आदरातिथ्य करणे आमच्यासाठी आनंदाची बाब असेल, असे अदनान अबू अल हैजा यांनी म्हटले.

तत्पूर्वी पॅलेस्टिनी राजदूत हाफिज सईदबरोबर व्यासपीठावर उपस्थित राहिल्याचे समोर आल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील एका प्रवक्त्यांनी शुक्रवारी याप्रकरणी एक निवेदन प्रसिद्ध केले होते. या निवेदनात म्हटले होते की, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार असलेला हाफिज सईद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असून त्याच्यासोबत पाकिस्तानातील पॅलेस्टिनी राजदूतांचे रॅलीतली छायाचित्रे सोशल मीडियातून व्हायरल झाली आहेत. पाकिस्तानी पत्रकार ओमार कुरेशी यांनी ही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली होती. भारताला हव्या असलेल्या दहशतवाद्यासोबत पॅलेस्टिनी राजदूत कसे काय बसू शकतात? असा सवाल करीत भारताने यावर आक्षेप घेतला होता.

Story img Loader