ऑक्टोबर २०२३ पासून इस्रायल आणि गाझामधील हमास या अतिरेकी संघटनेमध्ये युद्ध सुरू आहे. नऊ महिने झाले तरीही हा संघर्ष थांबलेला नाही. गाझा पट्ट्यातील हजारो नागरिकांना या संघर्षाला बळी पडावे लागले आहे. जागतिक स्तरावर हा संघर्ष थांबविण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्यात यश आलेले नाही. आता पॅलेस्टाईनचे पंतप्रधान आणि परराष्ट्र खात्याचे मंत्री असलेल्या मोहम्मद मुस्तफा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून या संघर्षात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याबद्दल मुस्तफा यांनी अभिनंदन करण्यासाठी लिहिलेल्या पत्रात गाझामधील युद्धविरामासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.
मोहम्मद मुस्तफा यांनी पत्रात म्हटले की, भारत जागतिक पातळीवर नेतृत्व करण्यासाठी पुढे येत आहे. तसेच भारताने मानवाधिकार आणि शांतता ही मूल्य जपली आहेत. गाझामध्ये चालू असलेला नरसंहार रोखण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
“भारताने सर्व राजनैतिक पर्यायाचा वापर करून गाझामध्ये युद्धबंदीची मागणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. गाझामध्ये जो संहार झाला आहे, त्याबद्दल तात्काळ मानवी मदत मिळवून देण्यात पुढाकर घेऊन गाझामधील लोकांचे दुःख हलके करण्यास मदत करावी. पॅलेस्टिनी नागरिकांचे संरक्षण आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्री समुदायाशी सहकार्य करत गाझामधील अत्याचाराविरोधात ठोस भूमिका घ्यावी”, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
युद्धविराम तात्काळ अमलात आणला जावा, यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला मागच्या वर्षी पाठिंबा दिला होता. तसेच इस्रायल-हमास संघर्षामुळे निष्पाप लोकांचे बळी जात असल्याबाबतही भारताने तीव्र निषेध व्यक्त केला होता. या सर्व परिस्थितीत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदा अमलात आणला जावा, अशीही मागणी भारताने केली होती.
१२ जून रोजी लिहिलेल्या या पत्रात पंतप्रधान मुस्तफा यांनी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदनही केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीत मिळविलेले यश नक्कीच प्रशंसनीय आहे. मोदींची देशाप्रती असलेली त्याग आणि समर्पण वृत्ती भारताला जागतिक पातळीवर आणखी पुढे नेत असल्याचेही ते म्हणाले. पॅलेस्टाईनमध्ये शांतता नांदावी, यासाठी भारताने घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो, असेही पंतप्रधान मुस्तफा म्हणाले.