इस्रायल-हमास युद्ध सुरू असतानाच गाझातील अल-अहली या रुग्णालयात भीषण स्फोट झाला. या स्फोटात तब्बल ५०० जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली. यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी गाझातील रुग्णालयावरील या हल्ल्याला इस्लामिक जिहाद जबाबदार असल्याचं वक्तव्य केलं. यावरून वाद निर्माण झाला आहे. नेतान्याहू यांच्या आरोपांवर संयुक्त राष्ट्रातील पॅलेस्टिनचे राजदूत रियाद मनसूर यांनी प्रत्युत्तर देत गंभीर आरोप केले.
रियाद मनसूर म्हणाले, “नेतान्याहू खोटारडे आहेत. त्यांच्या डिजीटल प्रवक्त्यांनी गाझातील रुग्णालयाच्या परिसरात हमासचा अड्डा असल्याचं आणि इस्रायलने हल्ला केल्याचं ट्वीट केलं. त्यानंतर हे ट्वीट डिलीट करण्यात आलं. आमच्याकडे त्या ट्वीटची एक कॉपी आहे. आता त्यांनी पॅलेस्टिनला बदनाम करण्यासाठी कथानक बदललं.”
व्हिडीओ पाहा :
“या हल्ल्याला इस्रायल जबाबदार आहे”
“इस्रायलच्या सैन्याच्या प्रवक्त्याने एक वक्तव्य केलं. त्यात त्याने रुग्णालय रिकामं करण्यास सांगितलं. यातून त्यांनी रुग्णालय रिकामं करा किंवा रुग्णालयावर हल्ला होईल असा इशारा दिला. त्यामुळे या हल्ल्याला इस्रायल जबाबदार आहे आणि या गुन्ह्यासाठी ते खोट्या कथा तयार करून शकत नाही,” असं मत रियाद मनसूर यांनी व्यक्त केलं.
गाझातील रुग्णालयात भीषण स्फोट, ५०० जणांचा मृत्यू
गाझातील अल अहली रुग्णालयात भीषण स्फोट होऊन जवळपास ५०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटामुळे रुग्णालय इमातीला भीषण आग लागली. या आगीत होरपळून अनेकांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णालय परिसरातील मैदानात मृतांचा खच पडला असून इमारतीच्या खिडक्या-दारेही तुटली आहेत. या मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. तर, त्यांच्या मृतदेहांशेजारी ब्लँकेट, शाळेच्या बॅगा आणि इतरस्त्र वस्तू पडल्या होत्या.
हेही वाचा : दक्षिण गाझावर इस्रायलचा बॉम्बवर्षांव; पॅलेस्टिनींपर्यंत मदतसामग्री पोहोचवण्याचे आव्हान
हल्ल्याची जबाबदारी कोणाची?
परंतु, हा हल्ला कोणी केला हे अद्याप अस्पष्ट आहे. इस्रायली लष्कराने हमासला या हल्ल्यासाठी जबाबदार धरले आहे, तर हमासने इस्रायलकडून रुग्णालयावर हवाई हल्ला केल्याचा आरोप केला आहे.