इस्रायलने त्यांच्या कारवाईची व्याप्ती वाढवत हमास शासित गाझापट्टय़ात सौम्य भूदल हल्ला केला आहे. त्यांच्या लष्कराने गेल्या २४ तासांत २०० ठिकाणी हल्ले केले. २०१२ नंतरचा सर्वात रक्तरंजित संघर्ष तिथे चालू आहे. आतापर्यंतच्या कारवाईत १६० पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.
तिसऱ्या इंतिफदाकडे..?
इस्रायलच्या शयेतेत १३ युनिटचे पाच कमांडो गाझापट्टय़ात हल्ले करताना जखमी झाले आहेत. रॉकेट सोडण्याची ठिकाणे नष्ट करण्यासाठी ते गेले होते. दरम्यान, इस्रायलच्या जेट विमानांनी उत्तर गाझापट्टय़ात पत्रके उधळून दुपारी कारवाई सुरू होईल त्यामुळे घरे सोडून जावीत असा इशारा दिला.
खास प्रशिक्षण दिलेल्या कमांडोंनी गाझा येथे हल्ले केले. हमासचे अतिरेकी जिथून रॉकेट सोडतात तिथे त्यांनी हल्ले केल्याचे इस्रायलच्या लष्कराने सांगितले. लक्ष्य नष्ट करण्यात आली, पण आमचे चार जवान जखमी झाले असून त्यांना बारझिलाई हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे असे इस्रायल संरक्षण दलांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय आवाहन धुडकावून इस्रायलने उत्तर गाझात कारवाई सुरू ठेवली असून, त्या भागातून जास्त रॉकेट हल्ले झाले आहेत. २४ तासांत २०० लक्ष्यांवर मारा करण्यात आला. त्यात काही मशिदी व संस्थांचे नुकसान झाले आहे. एकूण १३२० लक्ष्यांवर इस्रायलने हल्ला केला असून, दक्षिण इस्रायलवर होणारे रॉकेट हल्ले थांबवण्यासाठी सहा दिवसांची मोहीम राबवण्यात आली.
इस्रायली जेट विमानांनी हमासच्या ६२ इमारती व १४ नियंत्रण कक्षांवर हल्ला केला. गाझा येथे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार १६० पॅलेस्टिनी ठार झाले असून १००० लोक जखमी झाले आहेत. पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी इस्रायलवर ८०० रॉकेट्सचा मारा केला, त्यात २४ तासांत १३० रॉकेटचा मारा करण्यात आल्याचे समजते.