जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले लान्स नाईक हेमराज व सुधाकर सिंग यांचे मृतदेह बुधवारी त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. हेमराज (२९ वर्षे) हे उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातल्या शेरनगर येथील व सुधाकर सिंग (२८ वर्षे) हे मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील दरहीया गावचे रहिवासी होते.
हेमराज यांच्या गावी शोकाकुल वातावरण होते. राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळलेले त्यांचे पार्थिव गावी दाखल होताच शोकाकुल गावकऱ्यांनी ‘हेमराज अमर रहें’अशा घोषणा दिल्या. गावाच्या या सुपुत्राचा आम्हाला अभिमान आहे, या दु:खद प्रसंगी आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत अशी भावना यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केली.
या हल्ल्यातील दुसरे शहीद जवान सुधाकर सिंग यांच्या पश्चात पत्नी व चार महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव स्वीकारण्यासाठी मध्य प्रदेश पोलीस अधिकाऱ्यांची तुकडी उपस्थित होती. पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मध्य प्रदेशातील एका शूर जवानाचा दुर्दैवी अंत झाला असल्याची भावना मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजय सिंह यांनी व्यक्त केली.
हेमराज व सुधाकर हे दोघेही १३ राजपुताना रायफल्स तुकडीतील जवान होते. पुंछ जिल्ह्यातील मानकोटे येथे नियंत्रण रेषेपासून १००मीटर अंतरावर असलेल्या भारतीय लष्कराच्या गस्तीपथकावर असताना पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीने मंगळवारी सकाळी त्यांच्यावर हल्ला चढविला होता.
पाकच्या हल्ल्याबाबत विविध राजकीय पक्षांनी व्यक्त केला संताप
नवी दिल्ली : पाकिस्तानी लष्कराकडून दोन भारतीय जवानांची हत्या करण्यात आल्याच्या प्रकाराचा विविध राजकीय पक्षांनी तीव्र निषेध केला आहे. शेजारी देशाशी व्यवहार करताना यापुढे लक्ष्मणरेषा निश्चित करावी, अशी मागणी काँग्रेस आणि भाजपने केली आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री ए. के. अॅण्टनी यांनी राजीनामा द्यावा आणि भारताने पाकिस्तानच्या कृत्याचा सडेतोड जबाब द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
पाकिस्तानचा हा हल्ला भारतासाठी इशारा आहे. त्यामुळे पाकिस्तानशी यापुढे कोणताही व्यवहार करताना लक्ष्मणरेषा आखावीच लागेल हा इशारा आहे, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी म्हटले आहे.
या हल्ल्याबाबत भारताने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर सर्व वस्तुस्थिती मांडावी त्यामुळे जगभरात पाकिस्तानची मान शरमेने खाली जाईल, असेही जेटली यांनी म्हटले आहे. दोघा भारतीय जवानांना ज्या पद्धतीने ठार करण्यात आले त्यावरून या हल्ल्यामागील खरी भूमिका स्पष्ट होत आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पाकिस्तानने भारताच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते रशीद अल्वी यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानने जे कृत्य केले ते दुर्दैवी आहे. आता भारताच्या सहनशीलतेची परिसीमा झाली आहे, असेही अल्वी म्हणाले. माहिती आणि प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाकपनेही या कृत्याचा निषेध केला आहे.
दक्षिण आशियातील शांततेसाठी भारत-पाकिस्तान एकत्र काम करतील ; अमेरिकेने व्यक्त केली अपेक्षा
वॉशिंग्टन : पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले, त्याचा उल्लेख करून अमेरिकेने भारत आणि पाकिस्तान हे दोन शेजारी देश या क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी एकत्र काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
भारत आणि पाकिस्तान दक्षिण आशियात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी काम करतील, अशी अपेक्षा ठेवू या, असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी या क्षेत्राचा दौरा केल्यानंतर ही अपेक्षा व्यक्त केली असल्याचे पेण्टागॉनचे मीडिया सचिव जॉर्ज लिटल यांनी म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावाबाबतची कल्पना संरक्षण सचिव लिऑन पेनेट्टा यांना आहे. पाकिस्तानी सैन्याने भारतीय हद्दीत पूंछ क्षेत्रात घुसखोरी करून भारतीय जवानांवर हल्ला केला आणि दोन जवानांची हत्या केल्यानंतर पेनेट्टा यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
दहशतवादाविरुद्ध अमेरिकेची भूमिका अत्यंत कडक असून जो दहशतवादाविरुद्ध लढा देईल त्याच्या पाठीशी अमेरिका आहे, असे लिटल म्हणाले. दहशतवादाचा फटका आपल्या सर्वाना बसला आहे, त्यामुळे त्याविरुद्ध एकत्रित आघाडी उघडून त्याचा मुकाबला करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा