जम्मू-काश्मीरच्या पम्पोर जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षापथकांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या एका कॅप्टनसह सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. एका नागरिकाचाही या चकमकीत मृत्यू झाला आहे.
शनिवारी संध्याकाळी ही चकमक सुरु झाली. जम्मू-श्रीनगर महामार्गावरुन जाणा-या सीआरपीएफच्या बसवर आधी दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यानंतर जवळच्या प्रशिक्षण इमारतीत घुसले. दहशतवाद्यांनी नजीकच्या सरकारी इमारतीमध्ये आश्रय घेतला असून, अद्याप चकमक सुरु आहे. उद्यमशीलता विकास संस्थेच्या कार्यालयामध्ये शेकडो लोक अडकल्याची भीती असून, यामध्ये कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव या इमारतीमधील काही लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे, अन्य काही कर्मचारी आणि नागरिकांना सध्या सुरक्षितस्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या चकमकीत २२ वर्षीय कॅप्टन पवन कुमार यांच्यासह दोन जवान शहीद झाले आहेत.
इमारतीत तीन अतिरेकी घुसल्याची शक्यता असून, सुरक्षापथकांनी अतिरेक्यांशी दोन हात करताना सर्वप्रथम इमारतीतील नागरिकांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रीत केल्याचे एका अधिका-याने सांगितले आहे.