पनामा पेपरप्रकरणात सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. आयकर विभागाने पनामा प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून या प्रकरणात तपासाचे चक्र वेगाने सुरु असल्याचे समजते. आयकर विभागातील एक वरिष्ठ अधिकारी या प्रकरणातील पुरावे आणि माहिती गोळा करण्यासाठी ब्रिटिश व्हर्जिन आयलंडला रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य अमेरिकेतील पनामा या कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातील ‘मोझॅक फॉन्सेका’ या कायदा सल्लागार कंपनीची ११. ५ दशलक्ष गोपनीय कागदपत्रे उघड झाली होती. यात जगभरातील राजकारणी, उद्योगपती, व्यावसायिक, चित्रपट कलावंत, क्रीडापटूंनी मालमत्ता लपवण्यासाठी, कर चुकवण्यासाठी आणि अन्य लाभांसाठी पनामा, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, जर्सी, बहामा आणि सेशेल्स बेट या देशांमध्ये बोगस कंपन्यांमार्फत पैसा गुंतवल्याचे समोर आले होते. यामध्ये भारतातील ५०० जणांची नावे होते. यात अमिताभ बच्चन यांच्यासह के. पी. सिंग, समीर गेहलोत यांच्यासारख्या दिग्गज लोकांचा समावेश होता. नवाझ शरीफ यांच्यावरील कारवाईनंतर भारतातही पनामा पेपरप्रकरणातील संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार पनामा पेपरप्रकरणात आयकर विभागाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आयकर विभागातील एका अधिकाऱ्याने वृत्तपत्राला सांगितले की, आम्ही याप्रकरणात दिरंगाईची भूमिका घेतली नाही. तपासाची चक्रे वेगाने फिरत असून अन्य देशांमधून माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे असे त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. अमिताभ बच्चन यांची चौकशी करणार का असा प्रश्नही या अधिकाऱ्याला विचारण्यात आला होता. यावर अधिकारी म्हणाला, अमिताभ बच्चन यांनी आधीच हे आरोप फेटाळून लावलेले आहेत. पनामा पेपरमधील कंपन्यांशी संबंध नसल्याचे त्यांचा दावा आहे. आम्ही त्यांची सध्या थेट चौकशी करु शकत नाही. पण आम्ही यासंदर्भातील आणखी माहिती गोळा करत आहोत असे त्याने नमूद केले.

पनाना पेपरप्रकरणातून समोर आलेल्या माहितीनुसार परदेशातील चार शिपिंग कंपन्यांमध्ये अमिताभ बच्चन यांना संचालक म्हणून दाखवण्यात आले होते. यातील तीन कंपन्यांचे अधिकृत भांडवल ५ ते ५० हजार डॉलर इतके दाखवण्यात आले होते. तर बिग बींनी हे आरोप फेटाळून लावले होते. मी या कंपन्यांमध्ये संचालक नव्हतो. माझ्या नावाचा गैरवापर करण्यात आला होता असे त्यांनी स्पष्ट केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panama papers amitabh bachchan and others on income tax department radar cbdt officer sent to british virgin islands