जगभरात खळबळ उडवून दिलेल्या पनामा पेपर्समध्ये नमूद केल्याप्रमाणे आपला कोणत्याही परदेशी कंपनीशी संबंध नाही, असा दावा करणाऱ्या अमिताभ यांच्याविरोधात आता आणखी एक पुरावा पुढे आला आहे. पनामातील मोझॅक फॉन्सेका या कायदा कंपनीच्या कागदपत्रांनुसार अमिताभ बच्चन हे १९९३ ते १९९७ या कालावधीत चार परदेशी कंपन्यांचे संचालक होते. मात्र, हे वृत्त प्रसिद्ध झाल्याच दुसऱ्याच दिवशी अमिताभ यांनी त्याचा इन्कार करत आपल्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याचे सांगितले होते. मात्र, ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राच्या हाती लागलेल्या नव्या माहितीमुळे अमिताभ यांच्या दाव्याविषयी शंका उपस्थित झाली आहे. या माहितीनुसार, अमिताभ यांनी ते संचालक असलेल्या परदेशी कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीत टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला होता. ट्रॅम्प शिपिंग लिमिटेड आणि सी बल्क शिपिंग कंपनी लिमिटेडच्या ( ब्रिटीश व्हर्जिन आइसलँड) संचालक मंडळाची ही बैठक १२ डिसेंबर १९९४ रोजी झाली होती. याशिवाय, या दोन्ही कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या इन्कम्बसी सर्टिफिकेटमध्येही अमिताभ यांच्या नावाचा उल्लेख आहे.

जेधा येथील एका गुंतवणुक कंपनीकडून कर्ज घेण्यासंदर्भातील या कागदपत्रांचा उल्लेक मोझॅक फॉन्सेकाच्या नोंदीत आढळून आला होता. त्यामुळे आता अमिताभ बच्चन यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, याप्रकरणामुळे अमिताभ बच्चन यांना ‘अतुल्य भारत’चे ब्रँड अॅम्बेसिडर बनविण्याचा निर्णय केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाने लांबणीवर टाकला आहे. पनामा पेपर्स प्रकरणात पुढे आलेल्या तब्बल ५०० भारतीयांची नावे पुढे आल्याने केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन चौकशीत निर्दोष आढळल्यानंतरच अतुल्य भारतसाठी त्यांच्या नावाचा फेरविचार केला जाईल, असे सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा