भारतालाही चौकशीत मदत होणार
पनामाने आंतरराष्ट्रीय मानकानुसार आर्थिक व करविषयक माहितीची देवाणघेवाण करण्याचे प्रथमच मान्य केले असल्याची माहिती, द ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट म्हणजे ‘ओइसीडी’ या संस्थेने दिली आहे. पनामा पेपर्सच्या ऑनलाईन आवृत्तीत किमान २००० भारतीय व्यक्ती व संस्थांची नावे आहेत. आधीच्या कागदपत्रात पाचशे भारतीय व्यक्तींची नावे होती.
ओइसीडी या संघटनेने पनामाला काळ्या पैशाविरोधातील मोहिमेत आंतरराष्ट्रीय सहकार्य करण्यास सांगितले आहे. या संघटनेच्या बैठकीत भारताचा प्रतिनिधीही उपस्थित होता. बहारिन, लेबनॉन, नावरू, पनामा व वनाटू या देशांनी आर्थिक खात्यांच्या संदर्भातील माहितीची देवाणघेवाण करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता १०१ न्यायक्षेत्रातील देशांकडून माहितींची देवाणघेवाण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ओइसीडी व जी २० देशांनी ही माहिती कुठल्या प्रमाणित स्वरूपात द्यावी याचे काही निकष ठरवले आहेत, त्यांचेही पालन केले जाणार आहे.
पनामा पेपर्समधील व्यक्ती व आस्थापनांची चौकशी करण्यासाठी भारताने बहुसंस्थात्मक चौकशी गट स्थापन केला असून त्यात पनामाचे सहकार्य अपेक्षित आहे.
पनामाने याआधी माहितीच्या देवाणघेवाणीबाबत जाहीरनाम्यावर आधी स्वाक्षरी केली नव्हती पण आता त्या देशाने माहिती देण्याचे मान्य केल्याने भारतालाही चौकशीत त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे, असे अर्थमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. भारत ओइसीडीचा पूर्ण सदस्य नसला तरी त्यांची मानके व करचुकवेगिरीबाबत चौकशीतील सोपस्कारास भारत बांधील आहे.
पनामा पेपर्समध्ये एम्मा वॉटसन
हॅरी पॉटरमधील अभिनेत्री एम्मा वॉटसन हिचे नाव पनामाच्या ऑनलाईन आवृत्तीत आले असून तिच्या प्रवक्तयांनी ते मान्य केले आहे. एम्मा वॉटसन हिच्या परदेशात कंपन्या आहेत पण त्यातून तिला आर्थिक लाभ मिळत नाही किंवा त्यात करचुकवेगिरीचा हेतू नाही असे तिच्या प्रवक्तयांनी सांगितले.