कोलकाता : पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकांदरम्यान शनिवारी मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी राज्य निवडणूक आयोगाने ७०० जागांवर फेरमतदानाचे आदेश दिले. हे फेरमतदान सोमवारी होईल. काही ठिकाणी मतदान केंद्रे ताब्यात घेणे, मतपेटय़ांची मोडतोड आणि निवडणूक केंद्र अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या होत्या. मुर्शिदाबाद, कूचबिहार, माल्दा, दक्षिण २४ परगणा, उत्तर दिनाजपूर आणि नाडिया या जिल्ह्यांत प्रामुख्याने हा हिंसाचार झाला. या हिंसाचारात किमान १७ जण ठार झाले तर, अनेकजण जखमी झाले आहेत.   

राज्य निवडणूक आयुक्त राजीवा सिन्हा यांनी सांगितले की, सोमवारी  फेरमतदान घेण्यात येईल. त्यासाठी केंद्रीय दलांचा बंदोबस्त ठेवला आहे. राज्यातील ६१ हजार ६३६ मतदान केंद्रांवर फेरमतदान होईल. यातील सर्वाधिक १७५ केंद्रे मुर्शिदाबादमधील आहेत. दरम्यान, पंचायत निवडणुकीत कथित गैरप्रकार आणि हिंसाचाराच्या निषेधार्थ विविध भागांत रविवारी निदर्शने करण्यात आली. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात नंदकुमार येथे भाजप कार्यकर्त्यांनी हल्दिया-मेचेदा राज्य महामार्ग रोखला आणि श्रीकृष्णपूर हायस्कूलमधील मतमोजणी केंद्रात मतपेटय़ांमध्ये बदलाचा आरोप केला. तमलूकमधील भाजपच्या युवा शाखेचे नेते तमस डिंडा म्हणाले, की ‘‘मतपेटय़ा बदलल्या जात असल्याची माहिती आम्हाला पहाटे तीनला मिळाली.’’  पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला.

मालदा येथील रथबारी भागात काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग-१२ रोखून धरला. काँग्रेस  खासदार अबू हसम खान चौधरी यांनी सांगितले, की  आम्ही न्यायालयातही दाद मागणार आहोत. शनिवारी रात्री  मालदातील  बस्ता गावात काही गुंडांनी राज्यमंत्री तजमुल हुसैन यांच्या वाहनाची तोडफोड केली. दगडफेकीदरम्यान पोलिसांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यात एक पोलीस जखमी झाला आहे.

राज्यपाल दिल्लीत कोलकाता

पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस रविवार दिल्लीला रवाना झाले असून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राज्यातील पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराचा अहवाल सोपविण्याची शक्यता आहे. बोस हे सोमवारी सकाळी शहा यांना भेटण्याची शक्यता आहे.

Story img Loader