Chhattisgarh Viral Video: ‘पंचायत’ वेब सीरिजच्या तिसऱ्या सीजनमधला एक प्रसंग चाहत्यांच्या मनात अगदी ठसठशीतपणे घर करून बसला आहे. फुलेराच्या ग्रामस्थांनी स्थानिक आमदाराला पंचायत कार्यालयात एका कार्यक्रमासाठी बोलावलं असताना शांततेचा संदेश म्हणून त्याच्या हातात कबुतर दिलं जातं. पण आमदार महोदयांच्या आक्रस्ताळेपणामुळे कबुतर उडण्याआधीच जीव सोडतं. खरंतर हा सगळा प्रकार वेब सीरिजचा भाग म्हणून प्रेक्षकांनी चांगलाच एन्जॉय केला. पण खऱ्या आयुष्यात अशीच एक घटना घडली असल्याचं आता समोर आलं आहे. छत्तीसगडमध्ये याच सीनची खऱ्या आयुष्यात पुनरावृत्ती झाली आहे. फक्त फुलेरामधील आमदारांच्या जागी इथे खऱ्या आयुष्यात होते स्थानिक पोलीस अधीक्षक!
नेमकं घडलं काय?
हा सगळा प्रकार घडला तो छत्तीसगडच्या मुंगेली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस अधीक्षक हातातलं कबुतर हवेत उडवण्याचा प्रयत्न करत असताना ते न उडता थेट खाली कोसळलं.
त्याचं झालं असं, की मुंगेली जिल्ह्यात १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल देव, भाजपाचे स्थानिक आमदार पन्नूलाल मोहले व पोलीस अधीक्षक गिरीजा शंकर जयस्वाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शांतता आणि स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून कबुतर हवेत उडवण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार व्यासपीठावर तिघे मान्यवर उपस्थित असताना कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातात एकेक कबुतर दिलं.
…आणि पोलीस अधीक्षक संतापले!
आमदार पन्नूलाल मोहले आणि जिल्हाधिकारी राहुल देव यांच्या हातातील कबुतर उडाले. पण पोलीस अधीक्षक गिरीजा शंकर जयस्वाल यांच्या हातातलं कबुतर मात्र थेट खाली पडलं. त्यामुळे पोलीस अधीक्षक संतप्त झाले आणि त्यांनी तिथल्या तिथे संबंधित कर्मचाऱ्याला सुनावलं. यानंतर पोलीस अधीक्षकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून संबंधित कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली.
सचिन गुप्ता नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. “पंचायत ३ ची छत्तीसगडमध्ये पुनरावृत्ती. पोलीस अधीक्षक साहेबांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कबुतर हवेत सोडलं पण ते खाली पडलं”, अशी कॅप्शन या व्हिडीओबरोबर देण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक संतप्त, जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणावर तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. “स्वातंत्र्यदिनासारख्या एका मोठ्या राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशी कबुतर खाली पडण्याच्या त्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. जिल्हा स्तरावरील कार्यक्रमात आजारी कबुतर देण्यात आल्यामुळे ही घटना घडली आहे. हा प्रकार जर माझ्याऐवजी प्रमुख अतिथी व आमदारांच्या हातातील कबुतराच्या बाबतीत घडला असता, तर ते जास्त नाचक्की करणारं ठरलं असतं. त्यामुळे साहजिकच यासंदर्भातली जबाबदारी असणार्या अधिकाऱ्यानं त्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडलेली नाही”, असं पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.