जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या मृत्यूस काँग्रेसच अप्रत्यक्षपणे जबाबदार असल्याचा आरोप मध्य प्रदेश भाजपचे संघटन सरचिटणीस अरविंद मेनन यांनी करून एका नवीन वादास फोडणी दिली आहे.
दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीदिनानिमित्त येथील भाजपच्या मुख्यालयात बोलताना मेनन यांनी, काँग्रेसला उपाध्याय यांची भीतीच वाटत होती आणि त्यानंतर उपाध्याय हे मृतावस्थेत आढळले, अशी तोफ मेनन यांनी डागली. मेनन यांच्या या वक्तव्यांचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. मेनन यांनी हे भाषण केले तेव्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्रसिंग तोमर हेही उपस्थित होते.
दरम्यान, राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजय सिंग यांनी मेनन यांच्या या वक्तव्यास तीव्र आक्षेप घेतला असून उपाध्याय यांची कोणी हत्या केली हे मेनन यांना ठाऊक असेल तर त्यांनी संबंधितांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान दिले.
उपाध्याय यांचा अपघाती मृत्यू झाला, अशी ‘कथा’ सांगावी, असे अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्याला सांगितले होते, असा उल्लेख जनसंघाचे अन्य संस्थापक बलराज मधोक यांनी आपल्या ‘जिंदगी का सफर’ या आत्मचरित्रात केला होता, याकडेही अजय सिंग यांनी लक्ष वेधले.
बलराज मधोक यांनी तसे करण्यास नकार दिला तेव्हा त्यांना भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले. उपाध्याय यांच्या निधनानंतर वाजपेयी हे जनसंघाचे अध्यक्ष झाले तर बाळासाहेब देवरस हे चिटणीस झाले, असेही अजय सिंग म्हणाले.

Story img Loader