काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अलीकडेच स्वातंत्र्यवीर सावकरांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. सावरकरांनी ब्रिटीशांना माफीनामा लिहिला होता, त्यामुळे त्यांना ६० रुपये पेन्शन मिळत होती, असा कागदोपत्री आरोप राहुल गांधींनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर देशातील राजकीय वातावरण तापलं होतं. यावरून भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचे नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते.
ही घटना ताजी असताना आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकरांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंवर गंभीर आरोप केले आहेत. पंडित नेहरू हनीट्रॅपमध्ये अडकले होते, असा खळबळजनक दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
हेही वाचा- “मी राज्यपालांचा आगाऊपणा…” काळ्या टोपीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचं कोश्यारींवर टीकास्र!
ब्रिटीशकालीन भारताचे गव्हर्नर लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या पत्नी आणि पंडित नेहरू यांच्यातील संबंधाचा उल्लेख करत रणजीत सावरकर म्हणाले, “तुमचं वैयक्तिक चारित्र्य कसं आहे? हा संबंधित व्यक्तीचा वैयक्तिक अधिकार आहे. पण जेव्हा तुम्ही गोपनीयतेची शपथ घेता, तेव्हा तुम्हाला बायकोलाही काही सांगता येत नाही, असा कायदा आहे. पण नेहरू काम आटोपल्यानंतर दररोज रात्री २ वाजता लेडी माऊंटबॅटन यांना पत्र लिहायचे. हे माऊंटबॅटनच्या मुलीनं लिहिलं आहे, मी बोलत नाही.”
हेही वाचा- “महात्मा गांधींचा जातीभेदावर विश्वास होता”; रणजीत सावरकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “सावरकर जेव्हा…”
“नेहरू १२ वर्षे लेडी माऊंटबॅटन यांना पत्र लिहित होते. ते एकाकी होते, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. पण दिवसभर काय घडलं? हे तुम्ही तुमच्या बायकोलाही सांगू शकत नाही. पण ते लेडी माऊंटबॅटन यांना पत्र लिहून सांगायचे. लॉर्ड माऊंटबॅटन हे ब्रिटीशांचे अधिकारी होते. ते सतत सक्रिय राजकारणाचा भाग होते. त्यांच्या बायकोला तुम्ही अशाप्रकारे चिठ्ठ्या लिहिता, याला तुम्ही हनीट्रॅप म्हणणार नाही का?” असा सवाल रणजीत सावरकर यांनी विचारला आहे.