Parkash Singh Badal Passes Away: पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) प्रमुख नेते प्रकाश सिंग बादल यांचं मंगळवारी निधन झालं. ते ९५ व्या वर्षांचे होते. श्वास घेण्यास अडचण येत असल्याने प्रकाश सिंह बादल यांना एक आठवड्यापूर्वी मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रकाश सिंग बादल यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांचे पुत्र आणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी केली. भटिंडा येथील बादल गावात प्रकाश सिंग बादल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचं पार्थिव बुधवारी सकाळी मोहाली येथून बादल गावात आणण्यात येणार आहे.
सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये फोर्टिस रुग्णालयाने म्हटलं होतं की, “प्रकाश सिंग बादल हे आयसीयूमध्ये उपचार घेत असून ते वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली आहेत.” प्रकाश सिंग बादल हे पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री बनले होते.