कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरात झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही चित्रण निरूपयोगी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या प्राणघातक हल्ल्यात पानसरे यांचे शनिवारी रात्री निधन झाले होते . मात्र, अजूनही पोलीसांना या प्रकरणाचा माग काढता आलेला नाही. हल्लेखोरांचा शोधण्यासाठी पोलीसांनी गोविंद पानसरे यांच्यावर ज्या परिसरात हल्ला झाला त्या भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये हल्लेखोरांचा चेहरा आणि हत्येच्या घटनेचे चित्रण अस्पष्ट असल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे.
पानसरेंवर हल्ला झाला त्याठिकाणच्या एका शाळेच्या इमारतीवर हा सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला होता. याच इमारतीच्या गेटवरून पानसरे दाम्पत्य त्यादिवशी चालत गेले होते. सीसीटीव्ही बसवलेली इमारत या गेटपासून १५ ते २० मीटर अंतरावर आहे. मात्र, सीसीटीव्ही चित्रणात पानसरे दाम्पत्य चालत गेल्याचे दिसत आहे. त्यांच्यामागोमाग साधारण दोन सेकंदातच दोन बाईकस्वार या गेटवरून गेल्याचे दिसत असल्याची माहिती पोलीसांनी दिली. मात्र, यामधून पोलीसांना तपासाच्यादृष्टीने काहीच हाती लागलेले नाही.

Story img Loader