भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्याच्या गेले आहेत. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते पापुआ न्यू गिनी या देशात गेले आहेत. नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनीत आयोजित एचआयपीआयसी शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत. दरम्यान, पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे आज (२० मे) स्वतः मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होते. मोदींचं स्वागत करताना जेम्स मारापे यांनी मोदींच्या पायाला स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. मोदींनीही लगेच मारापे यांची गळाभेट घेतली.
पापुआ न्यू गिनी येथील मोरेस्बी (जॅक्सन) आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आलं. यावेळी विमानतळावर मोठ्या संख्येने अनिवासी भारतीय मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी भारतीय पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. नरेंद्र मोदी उद्या (२२ मे) पापुआ न्यू गिनी येथे आयोजित करण्यात आलेल्या एचआयपीआयसी शिखर परिषदेत सहभागी होतील.
हे ही वाचा >> विश्लेषण: मोहम्मद बिन तुघलक कोण होता? राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी दोन हजारांच्या नोटबंदीचा संबंध त्याच्याशी का लावला?
नरेंद्र मोदी यांच्या आधी कोणतेही भारतीय पंतप्रधान पापुआ न्यू गिनीला गेले नव्हते. या देशाला भेट देणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. पापुआ न्यू गिनीला जाण्यापूर्वी मोदी जपान दौऱ्यावर गेले होते. हिरोशिमा येथे आयोजित जी-७ शिखर परिषदेत ते सहभागी झाले होते. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. एचआयपीआयसी शिखर परिषदेत एकूण १४ देशांचे नेते सहभागी होणार आहेत.