नोटाबंदीच्या वर्षपूर्ती निमित्त ‘अँटी ब्लॅक मनी डे’ साजरा करण्याची तयारी केंद्र सरकारने केली असतानाच ‘पॅराडाईज पेपर्स’ उजेडात आले आहे. ‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये बोगस कंपन्यांचा खुलासा करण्यात आला असून या कंपन्यांचा वापर जगातील श्रीमंत मंडळी परदेशात पैसे पाठवण्यासाठी करत होती. यामध्ये भारतातील दिग्गज नेते, सिनेसृष्टीतील कलावंत आणि उद्योजकांचे नावही समोर आले आहे.

जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राच्या पुढाकाराने भारतातील इंडियन एक्स्प्रेससह जगातील ९६ नामांकित माध्यमसमूहांनी ‘पॅराडाईज पेपर्स’चा खुलासा करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. ‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये भारतातील ७१४ जणांचा समावेश आहे. कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बर्म्युडामधील ‘अॅपलबाय’ या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची १३. ४ दशलक्ष कागदपत्रे उघड करण्यात आली आहे.

बर्म्युडामधील अॅपलबाय आणि सिंगापूरमधील एशियासिटी या कंपन्यांनी करनंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १९ ठिकाणांवरुन स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा फिरवल्याचा गौप्यस्फोट ‘पॅराडाईज पेपर्स’मधून करण्यात आला आहे.  त्यातून जागतिक राजकारणी, उद्योगपती, व्यावसायिक, चित्रपट कलावंतांनी आपली मालमत्ता लपवली आणि कर चुकवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. ७१४ भारतीयांचा या यादीत समावेश असून ‘पॅराडाईज पेपर्स’मधील १८० देशांच्या यादीत भारत १९ व्या स्थानी आहे. नागरी हवाई राज्यमंत्री जयंत सिन्हा, अमिताभ बच्चन, विजय मल्ल्या, नीरा राडिया, संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त यांच्यासारख्या ख्यातनाम मंडळींचा यात समावेश आहे. अमिताभ बच्चन यांचे बर्म्यूडामधील एका कंपनीत समभाग असल्याचा धक्कादायक खुलासाही झाला आहे.

जागतिक पातळीवर अमेरिकेतील उद्योग मंत्री विलबर रॉस, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यासाठी निधी संकलन करणाऱ्यांचे नावही या यादीत आहे. याशिवाय ट्विटर आणि फेसबुकमध्ये रशियातील कंपन्यांची गुंतवणूक केल्याचा उल्लेखही या पेपर्समध्ये आहे.

एप्रिल २०१६ मध्ये ‘पनामा पेपर्स’ प्रकरण उघड झाले होते. यामध्ये ५०० भारतायींची नावे होती. या प्रकरणात केंद्र सरकारने चौकशीला सुरुवात केली होती. आता ‘पॅराडाईज पेपर्स’ हे प्रकरण उजेडात आल्याने केंद्र सरकार याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader