देशात लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ‘४०० पार’चा नारा दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून रोखण्यासाठी इंडिया आघाडीने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु आहे. यातच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती परकला प्रभाकर यांनी मोठे विधान केले आहे.
“२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळविला तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत”, असा दावा परकला प्रभाकर यांनी केला आहे. परकला प्रभाकर यांचा एक व्हिडिओ काँग्रेसने अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना परकला प्रभाकर यांनी हा दावा केला आहे.
परकला प्रभाकर नेमके काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर पुढे काय होईल? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर परकला प्रभाकर म्हणाले, “जर असे झाले तर पुन्हा निवडणुकीची अपेक्षा तुम्ही करु नका. आता २०२४ ची निवडणूक होत आहे. यामध्ये जर हे सरकार पुन्हा आले तर यानंतर पुन्हा निवडणुका होणार नाहीत. तुमच्याकडे असलेले देशाचे संविधान आणि नकाशा पूर्णपणे बदलेल. तुम्हाला ते ओळखताही येणार नाही. आता जे तुम्ही काही ऐकता एखाद्याला पाकिस्तानला पाठवा, त्याला तिकडे पाठवा. पण यानंतर अशा पद्धतीचे तुम्हाला लाल किल्ल्यावरून ऐकायला मिळेल. आता जे मणिपूरमध्ये होत आहे. उद्या ते आपल्या परिसरातही होऊ शकते. आता मणिपूर, लडाखमध्ये जी परिस्थिती आहे, तशी परिस्थिती संपूर्ण देशात होईल”, असे परकला प्रभाकर यांनी म्हटले आहे.