आवडत्या मुलाशी लग्न करण्यास विरोध करणाऱया आई-वडिलांनी पोटच्या मुलीला तब्बल चार वर्षे घरातील खोलीमध्ये डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी बंगळुरू शहरामध्ये उघडकीस आला. हेमावती असे या महिलेचे नाव असून त्या ३५ वर्षांच्या आहेत. एकाच खोलीत चार वर्षे डांबून ठेवल्यामुळे हेमावती यांची मानसिक स्थिती बिघडली असून, पोलिसांनी त्यांना मनोरुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी संबंधित निवासस्थानी मंगळवारी सकाळी छापा टाकला. त्यावेळी एका खोलीमध्ये हेमावती विवस्त्र अवस्थेत पडल्याचे त्यांना आढळून आले. पोलिसांनी तातडीने त्यांना नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ऍंड न्यूरो सायन्सेस रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. आपल्याला खूप भूक लागत होती आणि घरचे कधी कधी जेवायला देत होते, असे हेमावती यांनी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, हेमावतीच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. हेमावती ही मनोरुग्ण होती आणि ती औषधेही व्यवस्थित घेत नव्हती, असे तिचे वडील रेणुकाप्पा यांनी सांगितले. हेमावती आजारी असल्यामुळे आम्ही तिच्यावर उपचार करीत होतो. तिला घरात डांबून ठेवल्याची माहिती चुकीची असल्याचे तिचा भाऊ सोमशेखर यांनी सांगितले.