आपण नेहमी म्हणतो, एवढे पैसे कमावतोस जाताना काय बरोबर घेऊन जाणार आहेस का, पण चीनमधील एका गृहस्थाने शब्दश: खरे करून दाखवले. त्याने आयुष्यभरात ३३ हजार डॉलर्सची बचत केली होती. ते पैसे त्याच्या अंतिम इच्छेनुसार त्याच्या मृतदेहावर अग्निसंस्कार करताना जाळण्यात आले, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोन मुलांना त्याने हे पैसे मिळू दिले नाहीत.

त्याच्या मुलांनी वृद्धापकाळात त्याची काळजी घेतली नाही त्यामुळे चिडून त्याने अंतिम इच्छा तशी लिहिली होती. पूर्व चीनमधील जियांगसू प्रांतात ही घटना घडली. आपली आयुष्यभरातील बचत आपल्या मृतदेहावर जाळण्यात यावी असे त्याने अंतिम इच्छापत्रात म्हटले होते.
स्थानिक स्मशानाचा कर्मचारी यांग लिन याच्या गुरुवारी ही बाब लक्षात आली. त्याने दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी एक मृतदेह जळत असताना त्यावर नोटाही जळत होत्या. दहा वर्षांपूर्वी ताओ याने त्याचे शेत दोन मुलांना दिले होते आणि तो खेडय़ातील लहान घरात भाडय़ाने रहात होता.
शहरात कचरा गोळा करून तो उपजीविका चालवित असे. वयानुसार त्याला नंतर काम करता येत नव्हते म्हणून त्याने मुलांची मदत मागितली. त्यांनी कारणे सांगून वडिलांना सांभाळण्यास नकार दिला. आपले दिवस भरत आले आहेत हे ताओ यांना समजले होते. ताओ यांचे घरातच निधन झाले त्यांच्या मुलांनी मृतदेह स्मशानभूमीच्या ताब्यात दिला आणि ते बाहेर उभे राहिले. नंतर एक अज्ञात व्यक्ती ताओच्या बचतीचे पैसे मृतदेहावर जाळण्यासाठी घेऊन आली ते २,१०,००० युआन म्हणजे ३३,०५२ डॉलर होते. ते ताओच्या मृतदेहावर जाळण्यासाठी फेकण्यात आले तेव्हा त्याच्या मुलांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Story img Loader