दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत २०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. सध्या सर्वत्र या चित्रपटाचं कौतुक होताना दिसत आहे. हा चित्रपट १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. ‘हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यापेक्षा युट्यूबवर प्रदर्शित करा सर्वजण मोफत पाहतील,’ असं वक्तव्य मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले होते. त्यानंतर यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. नुकतंच अभिनेते परेश रावल यांनी यावरुन केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
बॉलिवूड अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार परेश रावल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी परेश रावल यांनी अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता एक ट्विट केले आहे. या ट्विटद्वारे त्यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
“जो आपल्या मुलांची खोटी शपथ घेऊ शकतो, तो पंडितांची काळजी काय करणार”, असे उपरोधिक ट्विट परेश रावल यांनी केले आहे. त्यासोबत त्यांनी कश्मीर फाइल्सचा हॅशटॅगही वापरला आहे. परेश रावल यांनी केलेल्या या ट्विटद्वारे त्यांनी अप्रत्यक्षपणे अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
फक्त एवढंच नव्हे तर एका नेटकऱ्याने केलेल्या ट्विटवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या नेटकऱ्याने अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. द कश्मीर फाइल्सच नाही तर यांनी दूरदर्शनवर रामायण दाखवण्यासही विरोध केला होता. आठवतंय का? असा प्रश्न त्या नेटकऱ्याने विचारला आहे. त्यावर परेश रावल म्हणाले, आणि आता अयोध्यासाठी स्पेशल ट्रेन काढत आहेत.
“भारत देश हा फक्त कफ परेड आणि अंधेरीदरम्यान…”, सलमान खानचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं असलं तरी आज भारतात एक वर्ग असाही आहे. ज्यांनी या चित्रपटाला सातत्यानं विरोध केला आहे. काही लोकांच्या मते विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटात सत्याची तोडमोड करून कथा मांडली आहे. ज्यामुळे मुस्लीम लोकांचा तिरस्कार केला जात आहे. मात्र यावर विवेक अग्निहोत्रींचं म्हणणं आहे की त्यांनी या चित्रपटात केवळ सत्य घटना दाखवली आहे. मात्र आता त्यांना यावरुन काहीही कारण नसताना वादात ओढलं जात आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.