पीटीआय, नवी दिल्ली
नेतृत्वाचे धडे ते ध्यानधारणा, परीक्षा विरुद्ध ज्ञान ते फलंदाजाप्रमाणे एकाग्रता साधणे अशा विविध विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरवर्षी बारावीच्या परीक्षेच्या आधी प्रसारित होणाऱ्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे यंदा आठवे वर्ष आहे. त्याचे दूरदर्शनवरून देशभरात प्रसारण झाले. ‘तुमच्या वेळेवर, जीवनावर प्रभुत्व मिळवा, प्रत्येक क्षण जगा, सकारात्मक गोष्टी शोधा, फुलण्यासाठी स्वत:चे पोषण करा,’ असे पंतप्रधानांनी या वेळी विद्यार्थ्यांना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंद सभागृहात विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांशी चर्चा करण्याची पद्धत या वर्षी दूर ठेवून दिल्लीतील सुंदर नर्सरी भागातील एका विशाल झाडाच्या सावलीत, निसर्गाच्या सान्निध्यात पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या कार्यक्रमात विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ३५ विद्यार्थी सहभागी झाले. या वेळी मोदी म्हणाले की, ज्ञान आणि परीक्षा या दोन भिन्न गोष्टी आहेत. परीक्षा हेच सर्वस्व आणि जीवनातील अंतिम गोष्ट आहे असे मानू नये, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते बंदिस्त करून ठेवू नये आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्याची मुभा द्यावी, पुरेशी झोप घ्यावी, प्रभावी व्यवस्थापनासाठी वेळेचे नियोजन करावे, असेही काही सल्ले मोदी यांनी दिले. मुले ही मिरवण्याची गोष्ट नाही, त्यांची इतरांबरोबर तुलना न करता त्यांच्या पाठीशी उभे राहा, अशा कानपिचक्याही त्यांनी पालकांना दिल्या. विद्यार्थ्यांनी त्यांना विविध प्रश्न विचारले आणि पंतप्रधानांनी त्याची उत्तरे दिली.

दुर्दैवाने असा सामान्य समज आहे की एखाद्याला १०वी आणि १२वीच्या परीक्षांमध्ये चांगले गुण मिळाले नाही तर त्याचे आयुष्य वाया जाते. आपल्या समाजात कमी गुणांवरून घरामध्ये तणावाचे वातावरण असते. तुमच्यावरही दबाव असू शकतो पण त्याची चिंता न करता तयारी करा आणि स्वत:ला आव्हान देत राहा.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पंतप्रधानांकडून परीक्षेचे धडे!

●पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येऊ घातलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी देशभरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

●बंद सभागृहातून प्रथमच निसर्गाच्या सान्निध्यात झालेली ‘परीक्षा पे चर्चा’ हे यंदाच्या या आठव्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

●नेतृत्व, ध्यानधारणेपासून ते क्रिकेटपर्यंत अनेक उदाहरणे देत पंतप्रधानांनी एकाग्रतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

●मैदानामध्ये गोंगाट सुरू असताना फलंदाजी करणाऱ्या खेळाडूकडून एकाग्रता शिकली पाहिजे, असे ते म्हणाले.

●देशभरातील अनेक शहरांमध्ये कार्यक्रमाचे थेट प्रसारण विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी पाहिले.

●विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते बंदिस्त करून न ठेवता त्यांना आवडीच्या गोष्टी करण्याची मुभा द्यावी असा सल्लाही पंतप्रधानांनी पालकांना दिला.

फलंदाजाकडून एकाग्रता शिका!

●मैदानामध्ये प्रेक्षकांचा गोंगाट सुरू असताना एखादा फलंदाज तो तणाव कसा हाताळतो ती एकाग्रता शिकली पाहिजे असे पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

●प्रेक्षक चौकार, षटकारांची मागणी करत असताना त्याकडे दुर्लक्ष करत तो पुढच्या चेंडूवर लक्ष करतो. विद्यार्थ्यांनीही अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि परीक्षांचा ताण घेऊ नये असे ते म्हणाले.