Pariksha Pe Charcha पंतप्रधान नरेंद्र मोदींची विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा सुरु आहे. या चर्चेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही महत्त्वच्या टिप्स दिल्या. तसंच त्यांना तिळगूळही दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना हेदेखील सांगितलं की तुम्ही काय खायला पाहिजे आणि काय नाही? तसंच अभ्यासाचा ताण येऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना क्रिकेटचा मंत्र दिला.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळता तेव्हा सामना सुरु असताना स्टेडियममधून आवाज येत असतात. कुणी सिक्स, कुणी फोर असं ओरडत असतं. फलंदाजाला ते ऐकू येत असतं का? तो समोरुन येणाऱ्या चेंडूकडे पाहात असतो. तो कसा खेळायचा त्याप्रमाणे तो खेळतो. लोकांचं ऐकून तो चौकार आणि षटकार मारु लागला तर त्याची विकेट पडेल. त्याचं संपूर्ण लक्ष समोरुन येणाऱ्या प्रत्येक चेंडूकडे असतं. तुम्हीही जर कोण काय सांगतं आहे यापेक्षा मला आज अभ्यास करायचा आहे, इतक्या वेळेत करायचा आहे. आज हा विषय, उद्या तो विषय असं केलंत तर तुम्हीही परीक्षेला सहज सामोरे जाऊ शकता.”
माझं अक्षरही चांगलं नव्हतं, पण…
पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की तुम्ही कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना त्या विषयाचा ताण घेऊ नका. मी जेव्हा विद्यार्थी दशेत होतो तेव्हा माझं हस्ताक्षर चांगलं नव्हतं. पण माझ्या शिक्षकांनी माझं अक्षर सुधारण्यासाठी मेहनत घेतली. या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात बिहारचा मुलगा विराज याने मोदींना विचारलं की तुम्ही जागतिक स्तरावरचे इतके मोठे नेते आहात, तुम्ही आम्हाला नेतृत्वाबाबत काही गोष्टी सांगा. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं.
नेतृत्वाचा अर्थ काय? मोदींनी सांगितला अर्थ
मोदी म्हणाले, “लीडरशीपचा अर्थ हा नाही की तुम्ही कुर्ता पायजमा घातलात आणि लीडर झालात. मोठमोठी भाषणं करुनही नेता होता येत नाही. तुम्हाला जर नेता व्हायचं असेल, नेतृत्व करायचं असेल तर तुमचं उदाहरण इतरांनी दिलं पाहिजे अशी व्यक्ती बना. तुमच्या वर्गात मॉनिटर असतो तसाच मी आहे. मॉनिटरने होमवर्क केला तरच तो इतर मुलांना होमवर्क केला का? हे विचारु शकतो.” असं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं.
यावेळी आयोजित करण्यात आलेला परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम अत्यंत खास आहे कारण या कार्यक्रमाच्या आठवड्या सत्रात दीपिका पादुकोण, भूमि पेडणेकर, विक्रांत मेस्सी, मेरीकॉम तसंच सद्गुरु जग्गी वासुदेव यांचाही समावेश असणार आहे.