पॅरिसमधील हल्ल्यांचा मास्टरमाईंड अब्दुलहमीद अबौदसह इतर काही दहशतवादी लपून बसल्याच्या शक्यतेने पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांना ठार मारण्यात बुधवारी यश आले. यापैकी एका महिला दहशतवादीने स्वतःच्या अंगावरील स्फोटकांच्या साह्याने स्फोट घडवून आणला. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. दुसरा दहशतवादी पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला. पोलिसांनी एकूण सात संशयितांना अटक केली आहे. सहा तास सुरू असलेल्या गोळीबारानंतर ही चकमक संपुष्टात आली.
पॅरिसच्या उत्तरेकडील उपनगरामध्ये एका इमारतीमध्ये दहशतवादी दडून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली. अब्दुलहमीद पोलिसांच्या मुख्य निशाण्यावर आहे. त्याचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार सुरू झाल्यावर पोलिसांकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आले.
गेल्याच आठवड्यात पॅरिसमधील रेस्टॉरंट, कॉन्सर्ट हॉल, नॅशनल स्टेडियम येथे सात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबार आणि बॉम्बस्फोटात १३० लोकांना आपला जीव गमावावा लागला होता. आयसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यांनतर फ्रान्स सरकारने सीरियातील आयसिसच्या तळांवर हवाई हल्ले सुरू केले. बुधवारीही फ्रान्सकडून आयसिसच्या तळांवर हल्ले करण्यात आले.
एकीकडे आयसिसच्या तळांवर हल्ले सुरू असताना, दुसरीकडे या हल्ल्यांसाठी मदत करणाऱ्या आणि हा कट रचणाऱ्या संशयित दहशतवाद्यांचा शोधही सुरू आहे. स्थानिक वेळेनुसार बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी इमारतीत दडलेल्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली. या कारवाईमध्ये दोन पोलिसही जखमी झाले आहेत. कारवाईवेळी हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सचीही मदत घेण्यात येते आहे, असे स्थानिक वृत्तवाहिन्यांनी सांगितले.
पॅरिसमध्ये पोलीस-दहशतवाद्यांतील चकमकीत दोन ठार, सात अटकेत
अब्दुलहमीद अबौद पॅरिस पोलिसांच्या मुख्य निशाण्यावर आहे.
Written by विश्वनाथ गरुड
Updated:
First published on: 18-11-2015 at 12:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paris anti terror raid one dead attack mastermind abdelhamid abaaoud is main target