पॅरिस हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्देल हमीद अबौद हा ठार झाल्याचे पॅरिसच्या सरकारी वकील फ्रान्स्वा मोलीन यांच्या कार्यालयातून गुरूवारी जाहीर करण्यात आले. पॅरिस पोलिसांनी सेंट डेनिसमध्ये छापा घालून केलेल्या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या त्वचेच्या नमुन्यावरून अबौदची ओळख पटल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अबौद आणि त्याचे साथीदार पॅरिसमधील सेंट डेनिस येथील एका इमारतीत लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पॅरिस पोलिसांनी या इमारतीवर छापा घातला. या कारवाईदरम्यान एका महिलेने केलेल्या आत्मघाती स्फोटात तिच्यासह आणखी एक दहशतवादी ठार झाला. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. तो मृतदेह अबौदचा असल्याचे सरकारी वकील फ्रान्स्वा मोलीन यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले. हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर आयसिसचे दहशतवादी रासायनिक आणि जैविक अस्त्रांचा वापर करू शकतात, अशी शक्यता फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्युल वाल्स यांनी व्यक्त केली. त्यादृष्टीने सुरक्षा उपाययोजना आखण्याचे आदेश त्यांनी दिले.
आणीबाणी वाढवली
पॅरिसमधील हल्ल्यानंतर देशात जारी करण्यात आलेल्या आणीबाणीची स्थिती आणखी तीन महिने कायम ठेवण्यासाठी वाल्स यांनी गुरुवारी संसदेत विधेयक मांडण्यात आले.
बेल्जियममध्ये छापासत्र
बेल्जियमच्या बिलाल हादफी या आत्मघाती दहशतवाद्याचा पॅरिस हल्ल्यात समावेश असल्याने बेल्जियम पोलिसांनी ब्रुसेल्समध्ये सहा ठिकाणी छापे घातले. ब्रुसेल्सच्या मोलेनबीक आणि इतर ठिकाणी हे छापे घालण्यात आले आहेत.

Story img Loader