फ्रान्समधील पॅरिसमध्ये सैनिकांच्या पथकाला एका कारने धडक दिल्याची घटना बुधवारी घडली. धडक दिल्यानंतर कारचालक पसार झाला असून पोलिसांनी कार चालकाचा शोध सुरु केला आहे. लष्कराच्या पथकावर जाणूनबुजून कार नेल्याचा संशय पोलीस व्यक्त करत असून या घटनेत सहा सैनिक जखमी झाले आहेत.
पॅरिसमध्ये ‘शार्ली एब्दो’वरील दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराचे पथक शहरात तैनात करण्यात आले आहे. हे पथक शहरातील मुख्य भागांमध्ये गस्त घालण्याचे काम करते. या पथकावर बुधवारी कारचालकाने हल्ला केला. अत्यंत वेगाने तो कार घेऊन पथकाच्या दिशेने जात होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. भरधाव कारच्या धडकेत सहा सैनिक जखमी झाले. यातील दोन सैनिकांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या घटनेनंतर पोलिसांनी पॅरिसमध्ये शोध मोहीम सुरु आहे. ज्या कारने धडक दिली ती बीएमडब्ल्यू कार होती अशी माहिती सूत्रांनी दिली. काही दिवसांपूर्वी आयफेल टॉवरजवळ एका मनोरुग्ण तरुणाने जवानांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा लष्कराच्या सैनिकांवर हल्ला करण्यात आला. हा अपघात नसून घातपातच आहे. पण या हल्ल्यामागे दहशतवादी संघटनांचा हात होता का याचाही तपास सुरु असल्याचे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले.