रेल्वे स्थानकांवर स्वच्छतेचा अभाव असल्याबद्दल संसदेच्या रेल्वेविषयक स्थायी समितीने चिंता व्यक्त केली आहे. याबाबत समितीने आपला अहवाल संसदेला सादर केला. त्यात रेल्वे स्थानकांवरची अस्वच्छता ही गंभीर बाब असल्याचे मत नोंदवले आहे.
देशात रेल्वेचे जाळे मोठे असल्याने प्रत्येक स्टेशनची तपासणी अशक्य आहे हे मान्य करतानाच याबाबत समितीने काही सूचना दिल्या आहेत. यात रेल्वेने सर्वच पातळ्यांवर विशेष तपासणी पथके स्थापन करावीत. यातून जेथे गरज असेल तेथे सुधारणा कराव्यात. रेल्वे प्रवाशांना अपुऱ्या सुविधांच्या तक्रारींबाबतही अहवालात समितीने लक्ष वेधले आहे. रेल्वेत तसेच स्थानकांवर पिण्याचे पाणीही मिळत नसल्याची तक्रार प्रवाशांची आहे याकडे समितीने लक्ष वेधले.
३१ सदस्यीय समितीने अलाहाबाद स्टेशनला भेट दिल्यावर त्यांना रेल्वे स्थानकांवर सुविधांचा कसा बोजवारा उडाला आहे याचे निरीक्षण नोंदवले.  अलाहाबाद स्टेशनमध्ये पाणी पिण्यालायक नव्हते. तेथे बाटलीबंद पाणी उपलब्ध होते. मात्र, त्याची किंमत सामान्यांच्या आवाक्याबाहेर होती. त्याचबरोबर उन्हाळ्यात सर्वच स्थानकांवर थंड पाणी उपलब्ध होईल अशी व्यवस्था करावी असे समितीने सुचवले आहे. प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सातत्याने सुधारणा व्हावी असे नमूद केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने प्रवास सुखकर कसा होईल ते पाहावे, असे समितीने अहवालात नमूद केले आहे. रेल्वेने आपल्या स्टेशनची वर्गवारी सात प्रकारांमध्ये केली आहे. ही वर्गवारी उत्पन्नावर आहे. ही वर्गवारी करताना आर्थिक निकषांबरोबर स्थानकाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व तसेच भौगोलिकता स्टेशनची प्रतवारी करताना विचारात घ्यावी, असे सुचवले आहे.