कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीमुळे उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीपासून ते थेट श्रीलंकेमधील तामिळी लोकांवर होणाऱ्या अन्यायापर्यंत अनेक मुद्यांवर विरोधकांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करीत संसदेचे कामकाज सलग दुसऱ्या दिवशी रोखून धरले. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही गृहांचे कामकाज मंगळवारी होऊ शकले नाही. बुधवारपर्यंत दोनही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले.
लोकसभेच्या कामकाजास सुरुवात होताच, समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, डावे पक्ष आणि एआयएडीएमके पक्षाच्या खासदारांनी ‘वेल’मध्ये येत, उत्तर प्रदेशमधील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत घोषणाबाजीस प्रारंभ केला; तर तामिळनाडूच्या खासदारांनी श्रीलंकेतील तामिळींवर होणाऱ्या अत्याचाराच्या मुद्यावरून सरकारवर हल्ला चढविला. पंजाबमधील महिलेला पोलिसांकडून झालेली मारहाण आणि पश्चिम बंगालमधील आदिवासी महिलेवर झालेला बलात्कार अशा अनेक मुद्यांवरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले.
मॅसिडोनियामधून आलेल्या संसदीय शिष्टमंडळाचे स्वागत लोकसभेच्या सभापती मीराकुमार यांनी केले मात्र त्यानंतर सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही. प्रथम दुपारपर्यंत व नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
राज्यसभेतही भारतीय जनता पक्षाव्यतिरिक्त अन्य विरोधकांनी कामकाज होऊ दिले नाही. त्यामुळे राज्यसभेचे कामकाजही प्रथम १२ वाजेपर्यंत, नंतर २ वाजेपर्यंत व अखेरीस दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
सलग दुसऱ्या दिवशी संसदेचे कामकाज ठप्प
कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीमुळे उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीपासून ते थेट श्रीलंकेमधील तामिळी लोकांवर होणाऱ्या अन्यायापर्यंत अनेक मुद्यांवर विरोधकांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करीत संसदेचे कामकाज सलग दुसऱ्या दिवशी रोखून धरले. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही गृहांचे कामकाज मंगळवारी होऊ शकले नाही.
First published on: 06-03-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parliament adjourned second day after uproar