Parliament Winter Session 2023 Updates : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना लोकसभेत आज अचानक गोंधळ झाला. शुन्य प्रहारात खासदार त्यांचं म्हणणं मांडत असताना प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी लोकसभेच्या सभागृहात उड्या मारल्या. दोघेही खासदारांच्या बाकावरून लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते. याचवेळी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या स्मोक कॅनमधून पिवळ्या रंगाचा धूर सोडला. यामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला. या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान, या घटनेत पोलिसांनी आतापर्यंत चौघांना ताब्यात घेतलं आहे.
संसदेत राडा करणारे दोन जण आणि संसदेबाहेर घोषणा देणारे दोन (एका महिलेसह) असे मिळून चार जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. संसदेत राडा करणाऱ्या दोन तरुणांची नावं सागर शर्मा आणि डी. मनोरंजन (३५) अशी आहेत. तर संसदेबाहेर नीलम (४२) आणि अमोल शिंदे (२५) या दोघांना पोलिसांनी पकडलं. संसदेबाहेर नीलम आणि अमोल शिंदे या दोघांनी “तानाशाही नहीं चलेगी (हुकुमशाही चालणार नाही), मणिपूरवासियांना न्याय द्या. महिलांवरील अत्याचार सहन करणार नाही. भारत माता की जय, हुकुमशाही बंद करा. जय भीम, जय भारत, वंदे मातरम.” अशा घोषणा दिल्या होत्या.
नीलम ही हरियाणामधील जींद जिल्ह्यातील घासो गावातली रहिवासी आहे. तिच्या वडिलांचं मिठाईचं दुकान आहे. पीटीआच्या हवाल्याने एबीपी न्यूजने म्हटलं आहे की, अमोल शिंदे हा महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातला रहिवासी आहे. नीलम आणि अमोल हे दोघे संसदेबाहेर घोषणा देत होते. तर डी. मनोरंजन हा कर्नाटकचा रहिवासी असून तो ऑटोरिक्षा चालवण्याचं काम करतो. या चौघांचा म्होरक्या असलेला सागर शर्मा हा उत्तर प्रदेशची राजधानी लखनौचा रहिवासी आहे. या चोघांनी काही दिवसांपूर्वी या हल्ल्याचा कट रचला होता.
हे ही वाचा >> संसदेतल्या राड्याचे महाराष्ट्रात पडसाद, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय; म्हणाले, “आजपासून प्रत्येक आमदाराला…”
या घटनेप्रकरणी चौघांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. खासदार आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी सागर आणि मनोरंजन यांना चोप दिला आहे. हा प्रकार त्यांनी कोणत्या उद्देशाने केला याची चौकशी केली जाईल. या घोषणाबाजीत मणिपूरचा उल्लेख असल्याने त्यादृष्टीनेही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा हेसुद्धा घटनेनंतर संसदेत दाखल झाले आहेत. ते स्वतः याप्रकरणी चौकशी करत आहेत.