Parliament Winter Session 2023 Updates: संसदेत हिवाळी अधिवेशनादरम्यान दोन अज्ञात तरुणांनी थेट लोकसभेत घुसखोरी केल्यामुळे मोठा गोंधळ झाला. देशाच्या संसदेत अधिवेशन चालू असताना दोन तरुण स्मोक कँडल घेऊन शिरलेच कसे? असा प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. लोकसभेत दोन तरुण शिरले असताना दुसरीकडे संसदेच्या बाहेरही काही तरुण घोषणाबाजी करताना व स्मोक कँडलचा वापर करताना दिसत होते. त्यातच नीलम नावाची महिलाही होती. नीलमला अटक करण्यात आली असून आता तिच्या भावाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय घडलं आज लोकसभेत?
लोकसभेत दुपारी चर्चा चालू असताना अचाकन दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट खासदार बसतात त्या ठिकाणी उडी घेतली. उडी घेताच त्यांनी धावपळ सुरू केली. खासदारांच्या बसण्याच्या ठिकाणावरून हे तरुण उड्या मारून थेट लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू लागले. खासदारांनी या तरुणांना घेराव घातला. त्यातल्या एका तरुणाला खासदारांनी मिळून चोप दिल्याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या तरुणांबरोबरच संसदेबाहेर घोषणाबाजी व स्मोक कँडलचा वापर करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यात नीलमचा समावेश होता.
आता संशयितांची संख्या वाढू लागली असून ती ४ वरून सहावर गेल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी तातडीने आपला तपास सुरू केला असून आयबीचं पथकदेखील या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी उतरलं आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेले तरुण नेमके कोण आहेत? याचा तपास चालू असताना संसदेबाहेर घोषणा देणारे अमोल शिंदे आणि नीलम यांच्या घरी पोलीस तपास करण्यासाठी पोहोचले. यातील अमोल शिंदे लातूरचा असून नीलम हरियाणाची असल्याचं स्पष्ट झालं आहे. तिच्या भावाने यासंदर्भात एएनआयशी बोलताना नीलमबाबत माहिती दिली आहे.
“नीलम दिल्लीला आहे हे माहितीच नव्हतं”
“नीलम माझी मोठी बहीण आहे. आम्हाला माहितीच नव्हतं की ती दिल्लीला गेली आहे. आम्हाला हेच सांगितलं होतं की ती हिसारमध्ये अभ्यासासाठी गेली आहे. ती राज्य सेवेच्या परीक्षेचा अभ्यास करते. ती परवा घरी आली होती. काल हिसारला परत गेली. तिचं बीए, एमए, एमफिल, बीएड, सीटॅट, नेट झालंय”, अशी माहिती तिच्या भावाने दिली आहे.
“बेरोजगारीचा मुद्दा तर तिनं अनेकदा उपस्थित केला आहे. शेतकरी आंदोलनातही ती गेली होती. याच कारणामुळे आम्ही तिला ५-६ महिन्यांपूर्वी हिसारला अभ्यासासाठी पाठवलं होतं. आज आम्हाला मोठ्या भावाचा फोन आला की टीव्ही चालू करा. तिथे कळलं की तिला दिल्लीत अटक केली आहे”, प्रतिक्रिया नीलमचा भाऊ राजेशनं दिली.
“मी काही महिन्यांपूर्वी तिच्याबरोबर दिल्लीला गेलो तेव्हा…”
“मी काही महिन्यांपूर्वी तिच्याबरोबर दिल्लीला गेलो होतो. तिची एक मुलाखत होती. आम्ही तिकडे बघितलं की ज्यांचे गुण नीलमपेक्षा कमी होते, त्यांना तिथे निवडलं गेलं. पण आम्हाला सांगितलं की तिच्या नावात बदल असून ते नीलम नाही तर नीलमदेवी आहे. त्यामुळे तुम्ही प्रतित्रापत्र तयार करून घेऊन या. आता आम्ही दिल्लीहून इथे येऊन प्रतिज्ञापत्र कसं बनवून घेऊन गेलो असतो लगेच?” अशी आठवणही राजेशनं नीलमची सांगितली.
“तिनं हे जे काही केलंय, ते बरोबर केलं की चुकीचं याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. तिच्याबरोबर जेव्हा बोलणं होईल, तेव्हाच काहीतरी कळू शकेल”, असंही नीलमच्या भावानं सांगितलं.