Parliament Winter Session 2023 Updates: बुधवारी लोकसभेत झालेल्या घुसखोरी प्रकरणाचे तीव्र पडसाद राष्ट्रीय स्तरावर उमटताना दिसत आहेत. विरोधी पक्षांनी संसदेत सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया किंवा निवेदन न आल्यामुळे या घटनेच्या दुसऱ्या दिवशीही लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोठा गदारोळ केला. हा गोंधळ इतका वाढला की कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या २० मिनिटांत तब्बल ३ तासांसाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं. यादरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत या प्रकाराबाबत आपली भूमिका मांडली.
नेमकं काय घडलं बुधवारी लोकसभेत?
लोकसभेत बुधावारी दुपारी कामकाज चालू असताना दोन तरुण अचानक प्रेक्षक गॅलरीतून उडी मारून खासदार बसतात त्या ठिकाणी आले. तिथून हे तरुण वेगाने अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेनं धावत निघाले. यावेळी त्यांनी हातातील स्मोक कँडल फोडून सभागृहात धूर केला. मात्र, काही खासदारांनी प्रसंगावधान दाखवत या तरुणांची वेळीच धरपकड केली. काही खासदारांनी त्यातल्या एका तरुणाला तर चांगलाच चोप दिला. दुसरीकडे संसदेच्या बाहेर एक तरुण व एक महिला घोषणाबाजी देत होते. त्यांनीही स्मोक कँडलचा वापर केल्यामुळे संसद परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं.
हा प्रकार घडताच सुरक्षारक्षकांनी या चौघांना ताब्यात घेतलं. बुधवारी दिवसभर केलेल्या तपासात या सगळ्या प्रकाराच्या नियोजनात सहभागी असलेल्या आणखी दोघांनाही दिल्ली पोलिसांनी अटक केली. दिल्ली पोलिसांबरोबरच आयबीही या प्रकाराचा तपास करत आहे.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ
दरम्यान, या प्रकारावर पंतप्रधान मोदींकडून कोणतंही निवेदन न आल्यामुळे विरोधकांनी गुरुवारी सकाळी कामकाज सुरू होताच लोकसभेत गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना शांततेचं आवाहन केलं. “काल जो प्रकार घडला, सगळ्यांनीच त्या घटनेचा निषेध केला. ही फार दुर्दैवी घटना आहे यात कोणतंही दुमत नाही. अध्यक्षांनीही त्याची दखल घेऊन तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. मला वाटतं की भविष्यात सत्ताधारी वा विरोधी पक्षाच्या सर्वच खासदारांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. आपण ज्या कुणाला प्रवेशासाठी पास देत आहोत, त्यात अशा कुठल्या व्यक्तीला पास दिला जाऊ नये जो अशा प्रकारचा कुठला प्रकार संसदेत करेल. आपण सगळ्यांनीच ही काळजी घेणं गरजेचं आहे”, असं आवाहन राजनाथ सिंह यांनी केलं.
दरम्यान, असाच प्रकार जुन्या संसद भवनातही घडल्याचं राजनाथ सिंह यांनी यावेळी नमूद केलं. “आपल्या जुन्या संसद भवनातही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. मला वाटतं या घटनेचा सर्वांनी मिळून निषेध करायला हवा. अध्यक्षांनी चौकशीचा अहवाल सादर करण्याचे व भविष्यातील उपाययोजनांचेही निर्देश दिले आहेत. मला वाटतं संसदेत अशा प्रकारे गोंधळाची स्थिती निर्माण करण्याची गरज नाही”, असं म्हणत राजनाथ सिंह यांनी विरोधकांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
आरोपी सागर शर्मा दिल्लीला पोहचण्याआधी आईला म्हणाला होता, “मी आता….”
…आणि सभागृहाचं कामकाज तहकूब
राजनाथ सिंह यांच्या आवाहनानंतरही विरोधकांचं समाधान झालं नाही. काही विरोधी पक्षाच्या खासदारांनी अध्यक्षांसमोर येऊन घोषणाबाजी व गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब केलं.