नवी दिल्ली : देशात स्थिर, निर्भय आणि ठोस निर्णय घेण्याची क्षमता असलेले सरकार असून ते मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अखंड काम करत आहे. देशवासीयांचा आत्मविश्वास शिखरावर असून नऊ वर्षांतील हा सर्वात मोठा सकारात्मक बदल आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्र सरकारच्या लोकाभिमुख धोरणांचा गौरव केला.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची मंगळवारी राष्ट्रपती मुर्मू यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बुधवारी लोकसभेत अर्थसंकल्प मांडतील. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी सादर होणारा हा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. २०२३ मध्ये नऊ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून आणखी १४ महिन्यांनी देश लोकसभेच्या निवडणुकीलाही सामोरा जाईल. त्या दृष्टीने राष्ट्रपती मुर्मू यांच्या संसदेच्या अधिवेशनातील पहिल्या अभिभाषणात मोदी सरकारच्या विकास व राष्ट्रवाद या दोन्ही मुद्दय़ांचे प्रतििबब उमटले.
धोरण लकव्यातून बाहेर पडून विकासाला चालना दिली जात असून दूरदृष्टीने निर्णय घेतले जात आहेत. आत्तापर्यंत समस्या सोडवण्यासाठी भारत जगाकडे पाहात होता, आता जग भारताकडे पाहू लागले आहे, असे मुर्मू म्हणाल्या. ‘जी-२०’ देशांच्या समूहाचे यजमानपद वर्षभर भारताकडे असून याकडे सरकार केवळ राजनैतिक भूमिकेतून नव्हे तर, देशाची संस्कृती-परंपरा जगासमोर मांडण्याची संधी म्हणून पाहात आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशा वेळी जागतिक समस्यांवर निराकरणाचा सामूहिक मार्ग शोधण्याचा प्रयत्न भारत करत आहे, असे मुर्मू म्हणाल्या. दहशतवादाविरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे या समस्येवर भारताने व्यक्त केलेल्या मतांकडे जग गांभीर्याने पाहू लागले असल्याचा मुद्दा राष्ट्रपतींनी अधोरेखित केला.
नऊ वर्षांत केंद्र सरकारने राबवलेल्या आयुष्मान भारत, पीकविमा, जलजीवन योजना, निवास योजना आदी विविध कल्याणकारी योजनांचा आणि विकासकार्याचा मुर्मूनी सविस्तर उल्लेख केला. देशवासीयांना मूलभूत सुविधा दिल्या जात आहेत. आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. डिजिटल नेटवर्क तयार करण्यात आले असून विकसित देशांनाही प्रेरणा मिळत आहे. आर्थिक घोटाळे आणि सरकारी योजनांमधील भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळाली आहे. इथे इमानदारांचा सन्मान केला जातो. गरिबी निर्मूलन ही घोषणा राहिलेली नाही. गरिबीचे कायमस्वरूपी निर्मूलन केले जात असून नव्या कल्पना आणि तंत्रज्ञानाच्या आधारे लोककल्याण केले जात आहे. परंपरा आणि संस्कृती जपतानाही आधुनिकतेला चालना दिली जात आहे. विकास करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. वैश्विक विचारांसह भारत आत्मविश्वासाने पुढे निघाला आहे, असा युक्तिवाद मुर्मू यांनी केला.
मतदारांनी सलग दोन वेळा स्थिर सरकारला निवडून दिले असून अनुच्छेद ३७०, तिहेरी तलाक कायदा रद्द करण्याचे धाडसी निर्णय घेतले गेले आहेत, असे मुर्मू म्हणाल्या. देशात भ्रष्टाचारमुक्त शासन-प्रशासन यंत्रणा उभी केली जात असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली. देशाला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी ‘राजपथा’चे ‘कर्तव्यपथ’ नामकरण केले आहे. अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी आणि महिलांच्या विकासासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
आपल्या लोकशाहीचे केंद्रस्थान असलेल्या या संसदेत, कठीण वाटणारी उद्दिष्टे ठरवून ती साध्य करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. उद्याची कार्यपूर्ती आजच झाली पाहिजे. इतर जे करू पाहात आहेत, त्याची पूर्तता आपण त्यांच्या आधीच केली पाहिजे, असे स्पष्ट करत मुर्मू यांनी देशातील लोकशाही परंपरेचे महत्त्व विशद केले. भारत हीच लोकशाही विचारांची जननी आहे. इथली लोकशाही समृद्ध आणि सशक्त होती आणि समृद्ध राहील, अशी ग्वाही राष्ट्रपती मुर्मू यांनी दिली.
घुसखोरीला चोख उत्तर
केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवादाविरोधात तीव्र प्रहार केला, सीमारेषेवर वा प्रत्यक्ष ताबा रेषेवर घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडल्याचे राष्ट्रपती आपल्या अभिभाषणात म्हणाल्या. लष्कराच्या आधुनिकीकरणावर सरकारचा सातत्याने भर असल्याचे स्पष्ट करताना देशात राजकीय आणि धोरणात्मक स्थिरता असेल तरच दीर्घकालीन शांतता प्रस्थापित होऊ शकते, असे मुर्मू यांनी स्पष्ट केले. ‘अग्निवीर’ योजनेद्वारे तरुणांना सैन्यदलात समावून घेतले जाईल, त्याद्वारे युवकांना राष्ट्रसेवेची संधी मिळेल, असेही मुर्मू म्हणाल्या.
Budget 2023: नोकरदारांना अर्थसंकल्पातून काय मिळणार? करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढणार?
अमृतकाळातील उद्दिष्टे
स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली असून पुढील २५ वर्षांच्या अमृतकाळात विकसित भारताच्या निर्मितीसाठी नागरिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. २०४७ पर्यंत गौरवशाली इतिहासाशी नाते सांगणारे आधुनिक राष्ट्र उभारले पाहिजे. हा भारत आत्मनिर्भर असेल, मानवी विकास साध्य करण्याची क्षमता असेल. देशाला नवी दिशा देण्यासाठी युवा-महिला नेतृत्व करतील. इथे गरिबी नसेल, मध्यमवर्ग संपन्न असेल, वैविध्य अधिक उज्ज्वल होईल, एकतेची भावना अधिक दृढ होईल. असा विविधांगी विकास साधणारा भारत घडवण्यासाठी अमृतकाळ अत्यंत महत्त्वाचा असेल, असा आशावाद मुर्मू यांनी व्यक्त केला.