काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या कथित जमीन घोटाळ्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने उभय सभागृहांचे कामकाज दोनदा स्थगित करावे लागले. ‘काँग्रेस का हाथ दामाद के साथ’ अशा घोषणा देत भाजप खासदारांनी लोकसभा दणाणून टाकली.
लोकसभेचे कामकाज सुरू होऊन दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहिली जाताच भाजप सदस्यांनी वढेरा प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नारेबाजी सुरू केली. ‘काँग्रेस का हाथ दामाद के साथ’ या घोषणांना सत्तारूढ बाकांवरून ‘काँग्रेस का हाथ गरीब के साथ’ असे प्रत्युत्तर मिळू लागले पण त्यात जान नव्हती. तेलुगू देसम पक्षाच्या खासदारांनी ‘आंध्र वाचवा, लोकशाही वाचवा’ असे लिहिलेले सदरे घालून अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत तेलंगणविरोधी घोषणाही त्याचवेळी सुरू केल्या होत्या. डावे पक्ष केरळातील सौरऊर्जा घोटाळ्याने वातावरण तापवू पाहात होते तर अन्य काही सदस्य किश्तवाडमधील हिंसाचाराबाबत जाब विचारत होते.
त्याचवेळी भाजप नेते यशवंत सिन्हा म्हणाले, ‘‘पैसा कमाविण्यासाठीचे आणि वाढविण्यासाठीचे अभ्यासक्रम शिकवणाऱ्या अनेक बिझिनेस स्कूल्स देशात आहेत. पण सत्तेच्या सर्वोच्च स्थानाशी नाते जोडलेला असा एकजण या देशात आहे जो कधीच अशा कोणत्या शाळेत गेलेला नाही. तरीही त्याने गुंतवणूकदेखील न करता कोटय़वधींची कमाई कशी करता येते, याचा पाठ घालून दिला आहे.’’
त्यांची ही टीका जिव्हारी लागलेले संजय निरुपम यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेतली तर संसदीय कामकाजमंत्री कमल नाथ आणि राज्यमंत्री राजीव शुक्ला हे जागीच उभे राहून सिन्हा यांचा प्रतिवाद करू लागले. गदारोळ वाढताच अध्यक्षा मीरा कुमार यांनी कामकाज दुपापर्यंत तहकूब केले. कामकाज सुरू झाल्यानंतरही वढेरा प्रश्नावरून गदारोळ सुरूच राहीला.
भाजप आणि काँग्रेस सदस्यांची नारेबाजीने राज्यसभेचे कामकाजही झाकोळले होते. सभागृहाला गोंधळगृहाची अवकळा आणायची तुमची इच्छा आहे काय, असा सवाल राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी केल्यानंतर तर विरोधक अधिकच आक्रमक झाले.
यंत्रणेचा सर्रास दुरूपयोग
वढेरा यांचे हरयाणातील जमीन व्यवहार प्रकरण हे राष्ट्रीयीकृत बँकेबरोबर केलेला गंभीर स्वरूपाचा गैरव्यवहारच आहे. हे प्रकरण एका राज्यापुरते मर्यादित आहे आणि संसदेत त्यावर चर्चा करण्याची गरज नाही, ही काँग्रेसची भूमिका म्हणूनच आम्हाला अमान्य आहे, असे भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. सरकारी यंत्रणेचा कमालीचा दुरूपयोग झाल्याने यावर संसदेच्या उभय सभागृहात सखोल चर्चा झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
संयुक्त जनता दलाची साथ
संसदेच्या कामकाजात वारंवार खंड येणे अयोग्य आहे, या काँग्रेसच्या भूमिकेला संयुक्त जनता दलाने मंगळवारी पाठिंबा दिला. भाजपने मात्र या दोघांवर कोरडे ओढत सांगितले की, उद्योग आणि शेतकरी यांच्या हिताला तिलांजली देणारे निर्णय सरकार घेत असेल तर संसदेचे कामकाज रखडले तरी काही बिघडत नाही.