Parliament Intruders Association : संसदेत घुसखोरी केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. संसदेचे सुरक्षा कवच भेदून दोन तरूण प्रेक्षक गॅलरीपर्यंत पोहोचले आणि त्यांनी सभागृहात गोंधळ घातला. तसेच संसदेच्या बाहेर एक महिला आणि तरुणाने घोषणाबाजी केली. या सर्व तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी चौकशीची चक्रे फिरविली असता आता नवी माहिती समोर आली आहे. संसदेत घुसखोरी करणारे सर्व तरूण सोशल मीडियावरील ‘भगत सिंग फॅन क्लब’ या पेजवरून एकमेकांच्या संपर्कात होते, असे पोलिसांनी सांगितले आहे.

आधी म्हैसूरला भेटले…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व तरूण दीड वर्षांपूर्वी म्हैसूर येथे भेटले होते. सागर नावाच्या तरुणाने जुलै महिन्यातही संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. १० डिसेंबर रोजी एक-एक करून सर्व जण आपापल्या राज्यातून दिल्ली येथे जमले. १३ डिसेंबरच्या दिवशी सर्वजण दिल्लीमधील इंडिया गेटजवळ एकत्र आले. त्यांना स्मोक कॅन देण्यात आले. अटक केलेल्या तरुणांकडून इतर लोकांचीही माहिती गोळा करण्यात येत आहे. या घुसखोरीचा मास्टरमाईंड कोण आहे? याचा तपास पोलिस करत आहेत. त्यातूनच राजस्थानमधील ललित झा नावाच्या तरूणाचे नाव समोर आले आहे.

हे वाचा >> Parliament Attack: आरोपी सागर शर्मा दिल्लीला पोहचण्याआधी आईला म्हणाला होता, “मी आता…….

सागर शर्मा नावाचा तरुण हा लखनऊमधील मानकनगर परिसरात राहणारा आहे. त्या डाव्या विचारांनी प्रभावित असल्याचे त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून दिसून येते. सागरचे फेसबुकवर दोन फेसबुक अकाऊंट आहेत. गेल्या काही महिन्यापासून हे दोनही अकाऊंट सक्रिय नाहीत. त्याच्या फेसबुक पेजवरून दिसून आले की, तो कोलकाता, राजस्थान आणि हरियाणामधील अनेक युवकांच्या संपर्कात होता.

सागर शर्माच्या कृत्यानंतर त्याचे कुटुंबिय घराला टाळे ठोकून अज्ञातवासात गेले आहेत. सागरच्या कुटुंबात आई-वडील आणि लहान बहिण आहे. हे कुटुंब मुळचे उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातील आहे. मात्र मागच्या २० वर्षांपासून ते लखनऊमध्ये राहत आहेत. सागरच्या कुटुंबियांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच सागर दिल्लीला गेला होता. तसेच त्याने संसदेत काय केले? याबद्दल आम्हाला माहिती नाही.

sagar sharma status
सागर शर्माने लोकसभेत घुसखोरी करण्याआधी इन्स्टाग्रामवर स्टेटस टाकले होते.

सागर आणि नीलम भगत सिंग यांच्या विचारांनी प्रेरित

सागर शर्मा आणि डी. मनोरंजन (३५) यांनी प्रत्यक्ष संसदेत प्रवेश करून सभागृहात स्मोक कॅन फोडले. तर संसदेबाहेर नीलम (४२) आणि अमोल शिंदे (२५) या दोघांनी स्मोक कॅन फोडून घोषणाबाजी केली. नीलम आजाद या नावाने नीलमचे फेसबुक अकाऊंट आहे. ती नेहमीच राजकीय आणि सामाजिक विषयांवर सोशल मीडियावर भाष्य करताना दिसते. ११ नोव्हेंबर रोजीच तिने संसद आणि विधानसभेत महिलांना ५० टक्के आरक्षण असावे, अशी मागणी केली होती.

आणखी वाचा >> Parliament Attack : अमोल शिंदे लातूरहून निघताना आई-वडिलांशी काय बोलला?

sagar sharma facebook post
सागर शर्माची फेसबुक पोस्ट

विशेष म्हणजे २३ मार्च रोजी सागर आणि नीलम यांनी भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना अभिवादन करणाऱ्या पोस्ट टाकलेल्या दिसतात. २३ मार्च रोजी या तीनही स्वातंत्र्यसैनिकांना ब्रिटिशांनी फाशी दिली होती. तेव्हापासून २३ मार्च शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो.

Neelam Azad post
नीलम विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर सोशल मीडियावर व्यक्त होत असते.

नीलमच्या (फेसबुकवरील नाव नीलम आझाद) फेसबुकवरील अबाऊट पेजमध्ये नीलमने स्वतःला सामाजिक कार्यकर्ती म्हटले आहे. प्रगतीशील आझाद युवासंघटन या संस्थेशी ती निगडित असल्याचेही तिने जाहीर केलेले आहे.