Parliment Security Breach : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना १३ डिसेंबर रोजी लोकसभेत गदारोळ झाला. प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी लोकसभेत उडी मारून कॅनमधील पिवळा धूर सोडला. यामुळे काहीकाळ कामकाज ठप्प झालं होतं. तर, खासदारांनाही क्षणभर काय होतंय हे कळलं नाही. याप्रकरणी सातत्याने नवनवे खुलासे समोर येत आहेत. आरोपींची दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या प्रकरणातील ललित झा याला काल (१५ डिसेंबर) पटियाला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली. या कटाचा मीच मुख्य सुत्रधार असल्याचं ललित झा याने पोलिसांच्या चौकशीत मान्य केल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं. तसंच, त्याला सात दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे.

या घटनेमागील कथित सूत्रधार ललित झा आणि त्याच्या सहआरोपींना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला भाग पाडण्यासाठी देशात अराजकता निर्माण करायची होती, असं दिल्ली पोलिसांनी न्यायालयाकडे त्यांच्या रिमांड याचिकेत नमूद केले. हल्ल्यामागचा खरा हेतू, त्यांचे शत्रू देशांशी आणि दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती कोर्टात देण्यात आली.

हेही वाचा >> Parliament Security Breach: “ललित खूप चांगला मुलगा आहे, मला त्याच्या कृत्याविषयी…”, वडिलांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, “आम्ही संसदेच्या आत आणि संसद भवनाबाहेर गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी परवानगी घेण्यासाठी संसदेकडे जाण्याचा विचार करत आहोत. गुरुवारी अटक करण्यात आलेल्या ललित झा याने चौकशीदरम्यान खुलासा केला की, त्याने आपला फोन दिल्ली-जयपूर सीमेजवळ फेकून दिला आणि इतर आरोपींचे फोन नष्ट केले”, एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

या कटाचा मीच सूत्रधार

संसदेच्या आवारात आणि लोकसभेच्या सभागृहात धूर पसरवत गोंधळ घालणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. तसंच हे आरोपी ज्या दाम्पत्याकडे राहिले होते त्यांनाही पोलिसांनी अटक केली. यानंतर या कटाचा मास्टरमाईंड ललित झा हा फरार होता. त्याने पोलिसांसमोर गुरुवारी उशिरा आत्मसमर्पण केलं. त्यानंतर आज ललितला पटियाला हाऊस कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने स्वतःच आपण या कटाचा सूत्रधार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच या प्रकरणी आता त्याची कसून चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

दिल्ली पोलिसांनी काय मागणी केली होती?

दिल्ली पोलिसांनी कोर्टाकडे ललित झा याला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली जावी अशी मागणी केली होती मात्र त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती डॉ. हरदीप पुरी यांनी आरोपी ललित झा याला विचारलं की तुझ्याकडे वकील आहे का? त्यावर त्याने नाही असं उत्तर दिलं. संसदेत गदारोळ घालून धूर पसरवणारे सागर शर्मा, मनोरंजन डी, नीलम आजाद आणि अमोल शिंदे यांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी गुरुवारी सुनावण्यात आली. 

Story img Loader