लोकसभेतील २५ खासदारांना निलंबित करण्याच्या निर्णयाविरोधात कॉंग्रेसच्या खासदारांनी बुधवारी सलग दुसऱया दिवशी संसद भवन परिसरात धरणे आंदोलन केले. युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाविरोधात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मोर्चा काढला होता.
लोकसभा अध्यक्षांनी सोमवारी दुपारी कॉंग्रेसच्या २५ खासदारांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्याचा निर्णय घेतला. यावर कॉंग्रेससह इतर सर्वच विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. कॉंग्रेसच्या खासदारांनी मंगळवारी संसद भवन परिसरात काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलनही करण्यात आले. बुधवारीही कॉंग्रेसच्या नेत्यांनी आणि खासदारांनी संसद भवन परिसरात धरणे आंदोलन केले. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, लोकसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आम्हाला पटलेला नाही. पण आम्ही त्यांच्या पदाचा मान ठेवतो.
दरम्यान, युवक कॉंग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी सुमित्रा महाजन यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर मोर्चा काढला. यावेळी निषेधाचे अनेक फलक कार्यकर्त्यांनी आणले होते. निवासस्थानाजवळच अलीकडेच पोलीसांनी हा मोर्चा अडविला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलीसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. पोलीसांनी काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा