नवी दिल्ली : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगाचे नेते म्हणून उदय झाला असताना’ विरोधकांनी हा अविश्वास प्रस्ताव आणण्याची गरज नव्हती, अशी टीका केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली. काँग्रेस- इतर विरोधी पक्षांनी ‘चुकीच्या वेळी, चुकीच्या पद्धतीने’ मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला, असे ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देश २०४७ पर्यंत विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना सरकारविरोधात अशा प्रकारच्या प्रस्तावाची गरजच नव्हती असा दावा रिजिजू यांनी केला. त्याऐवजी ‘विरोधी पक्षांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सरकारबरोबर यावे आणि पंतप्रधानांनी पुढील २५ वर्षांसाठी निर्धारित केलेले लक्ष्य साध्य करण्यासाठी काम करावे’, असे आवाहन त्यांनी केले.

गरीब पित्याच्या मुलाविरोधात प्रस्तावदुबे

सत्ताधारी बाकावरून भाजपचे निशिकांत दुबे यांनी सर्वप्रथम भाषण केले. लोकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या ‘गरीब पित्याच्या मुला’विरोधात विरोधकांनी हा अविश्वास प्रस्ताव आणल्याची टीका त्यांनी केली. विरोधक आपापसात भांडत आहेत आणि स्वत:ला ‘इंडिया’ म्हणवत आहेत, असे म्हणत टीका करताना त्यांनी ‘इंडिया’च्या घटक पक्षांना लक्ष्य केले. इतिहासातील उदाहरणे देत त्यांनी काँग्रेस, द्रमुक, राजद, सप या पक्षांवर टीका केली. ‘महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कथित सिंचन घोटाळय़ाविरोधात श्वेतपत्रिका काढली होती’, असे दुबे म्हणाले. दुबेंनी काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचा उल्लेख

केला. ‘सोनियाजी इथे बसल्या आहेत, त्यांना आपल्या मुलाला ‘सेट’ करायचे आहे, तर जावयाला ‘भेट’ द्यायची आहे, त्यासाठी हा ठराव आणलेला आहे’, असे दुबे म्हणाले. दुबेंच्या या विधानामुळे सोनिया गांधीही हसायला लागल्या.

द्रमुकला वाजपेयींचे स्मरण

विरोधकांकडून चर्चेमध्ये सहभागी झालेले द्रमुकचे टी आर बालू यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण काढली. वाजपेयी हे राजधर्माच्या पाठीशी उभे राहिले, पण आज जेव्हा महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढली जात असताना आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू शकत नाही अशी टीका बालू यांनी केली. संपूर्ण जगाने मणिपूरमध्ये जे घडले त्याचा निषेध केला आहे, युरोपीय महासंघाच्या पार्लमेंटने यावर चर्चा केली आहे, तर ब्रिटिश पार्लमेंटने पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या पक्षाचा तीव्र निषेध केला आहे असे बालू म्हणाले.

अनेक दशकांच्या धोरणांमुळे मणिपूरमध्ये हिंसा

मणिपूरमधील हिंसाचार हा अनेक दशकांच्या धोरणांचा परिणाम आहे असा दावा अविश्वास प्रस्तावाला विरोध करणाऱ्या बिजू जनता दलाच्या पिनाकी मिश्रा यांनी केला. काँग्रेसने आणलेल्या कोणत्याही प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जो प्रस्ताव मंजूर होणारच नाही तो आणण्यामागे कोणताही तर्क आणि राजकीय शहाणपण नाही असे ते म्हणाले. काँग्रेस स्वत:चे नाक कापून इतरांना अपशकून करत आहे अशा शब्दांमध्ये त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी जेव्हा लोकसभेत बोलण्यासाठी उभे राहतात तेव्हा ते काँग्रेसचे वाभाडे काढतात असा इशारा त्यांनी दिला.

९ वर्षांमध्ये ९ सरकारे पाडली : सुप्रिया सुळे

केंद्रातील भाजपप्रणीत एनडीए सरकारने गेल्या ९ वर्षांमध्ये ९ राज्य सरकारे पाडण्याचे काम केले आहे. भाजपकडे आता राजकीय वैचारिकता राहिलेली नाही, त्यामुळे ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे भाजपने स्वत:ला म्हणवून घेऊ नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हाणला. सुळे यांनी महागाई, बेरोजगारीचा प्रश्न, शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्नाचे आश्वासन, नोटाबंदीतील फोलपणा या लोकांशी निगडित प्रश्नांवरून केंद्र सरकारला धारेवर धरले. मणिपूरच्या मुद्दय़ावरही सुळे यांनी केंद्राला लक्ष्य बनवले. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची सुळे यांनी मागणी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parliament monsoon session no confidence motion at wrong time says kiren rijiju zws