नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील विधानसभा निवडणुकांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. गुजरातमधील मतदानाचा दुसरा टप्पा झाल्यानंतर, डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ामध्ये अधिवेशन भरवले जाऊ शकते, असे संसद प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखा अजून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. दोन राज्यांतील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांचे म्हणणे आहे.
दरवर्षी नोव्हेंबरच्या तिसऱ्या वा चौथ्या आठवडय़ात संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. हिमाचल प्रदेशमध्ये शनिवारी (१२ नोव्हेंबर) तर, गुजरातमध्ये १ डिसेंबर व ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. संसदेच्या अधिवेशनाचे दिवस तारखा ठरवण्यासंदर्भातील केंद्राची बैठकही अजून झालेली नाही. हिवाळी अधिवेशन नाताळच्या सुट्टीआधी संपते. त्यामुळे यंदा हिवाळी अधिवेशन जेमतेम तीन आठवडे असेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नव्या इमारतीत फक्त एक दिवस!
संपूर्ण हिवाळी अधिवेशन नव्या संसद इमारतीमध्ये घेण्याचा केंद्र सरकारचा मनोदयही लांबणीवर पडणार असून फक्त एक दिवस दोन्ही सभागृहांचे कामकाज नव्या इमारतीत होणार आहे. उर्वरित अधिवेशन जुन्या संसदभवनामध्ये पार पडेल. नव्या इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी ४ हजार कामगार कार्यरत आहेत. मात्र, अजूनही दर्शनी भागातील बांधकामही पूर्ण झालेली नाही.
इमारतीमधील दोन्ही सभागृहे उभारली असली तरी, ती अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज झालेली नाहीत. सध्या संसद भवनाच्या द्वार क्रमांक दोनच्या शेजारी तात्पुरती भिंत उभी करण्यात आली असल्याने मुख्यद्वाराकडे जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. संसदेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नव्या इमारतीमध्ये अधिवेशन घेण्यासंदर्भात अजून तरी केंद्र सरकारकडून सूचना आलेली नाही. मात्र, संविधान दिवस साजरा करण्यासाठी अधिवेशनाचे एका दिवसाचे कामकाज नव्या इमारतीमध्ये घेतले जाऊ शकते. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन कदाचित नव्या इमारतीमध्ये होऊ शकेल, असा अधिकाऱ्यांचा कयास आहे.