Parliament Security Breach: संसदेत झालेल्या गदारोळानंतर आणि धुराचे लोट पसरवल्या प्रकरणी चार जणांना आधी अटक करण्यात आलं आहे. त्यानंतर या प्रकरणाचा सूत्रधार ललित झा याने आत्मसमर्पण केलं आहे. त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्याला कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आता ललित झा याच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हटलं आहे ललित झा याच्या वडिलांनी?
“ललित हा चांगला मुलगा आहे. तो असं काही करेल वाटलं नव्हतं. ललित झा कोचिंग करायचा, मुलांना शिकवायचा. मी पंडित आहे, भिक्षुकी करतो. ललित ट्युशन घेत होता आणि कोचिंग सेंटरमध्ये काम करत होता. आमच्या घरात टीव्हीही नाही. जे काही मोबाइलवर कळलं त्यातून त्याला अटक झाल्याचं समजलं. त्याने काहीतरी केलं आहे याची माहिती मला काल (गुरुवार) मिळाली.” असं ललित झा याच्या वडिलांनी म्हटलं आहे.
संसदेच्या आवारात आणि लोकसभेच्या सभागृहात धूर पसरवत गोंधळ घालणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. तसंच हे आरोपी ज्या दाम्पत्याकडे राहिले होते त्यांनाही पोलिसांनी अटक केली. यानंतर या कटाचा मास्टरमाईंड ललित झा हा फरार होता. त्याने पोलिसांसमोर गुरुवारी उशिरा आत्मसमर्पण केलं. त्यानंतर आज ललितला पटियाला हाऊस कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने स्वतःच आपण या कटाचा सूत्रधार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच या प्रकरणी आता त्याची कसून चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
दिल्ली पोलिसांनी काय मागणी केली होती?
दिल्ली पोलिसांनी कोर्टाकडे ललित झा याला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली जावी अशी मागणी केली होती मात्र त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती डॉ. हरदीप पुरी यांनी आरोपी ललित झा याला विचारलं की तुझ्याकडे वकील आहे का? त्यावर त्याने नाही असं उत्तर दिलं. संसदेत गदारोळ घालून धूर पसरवणारे सागर शर्मा, मनोरंजन डी, नीलम आजाद आणि अमोल शिंदे यांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी गुरुवारी सुनावण्यात आली. पोलिसांनी चौकशीसाठी यांनाही पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली जावी अशी मागणी केली होती.
काय घडलं होतं बुधवारी?
बुधवारी लोकसभेत शून्य प्रहर संपण्यासाठी काही मिनिटं उरलेली असताना प्रेक्षक गॅलरीतून दोन युवकांनी सदनात उड्या मारल्या आणि त्यांच्याकडे असलेल्या कॅनमधून पिवळ धूर संसदेत पसरवला. यामुळे एकच गदारोळ झाला. यावेळी या दोघांना तिथे असलेल्या खासदारांनी पकडलं आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या दोघांसह बाहेर घोषणाबाजी करुन धूर पसरवणाऱ्या दोघांनाही अटक केली. या चौघांनाही आता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर रात्री उशिरा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ललित झा याने पोलिसांसमोर येत शरणागती पत्करली. त्यालाही आता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.