नवी दिल्ली : ‘१३ डिसेंबर २०२३ रोजी संसदेच्या सुरक्षात्मक नियमभंगातील आरोपींना भारताच्या लोकशाहीला बदनाम करायचे होते, तत्काळ जागतिक प्रसिद्धी मिळवून सत्ता बळकावायची होती आणि लोकशाहीच्या प्रतिकाला लक्ष्य करून समृद्धी आणि वैभवही मिळवायचे होते’, असे दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. एक हजार पानांचे हे आरोपपत्र जूनमध्ये पटियाला हाऊस न्यायालयात दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने गेल्या महिन्यात त्याची दखल घेतली होती. जुलैमध्ये याप्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा >>> छत्तीसगडमध्ये चार हजार ‘सीआरपीएफ’ जवान तैनात! नक्षलविरोधी मोहिमेसाठी झारखंड, बिहारमधील तुकड्या माघारी

आरोपी प्रथम समाजमाध्यमावर भेटले आणि २००१ च्या संसद हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त सुमारे दोन वर्षे त्यांच्या हालचालीची योजना आखली. त्यांची पहिली वैयक्तिक बैठक फेब्रुवारी २०२२ मध्ये म्हैसूर येथे झाली होती, असे आरोपपत्रात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपींनी म्हैसूर, गुरुग्राम आणि दिल्ली येथे एकूण पाच बैठका घेतल्या. या वेळी त्यांची योजना अंतिम करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकातील रहिवासी मनोरंजन डी. याच्या नेतृत्वाखालील तरुणांचा गट समाज माध्यमात भेटल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केलेल्या सहा आरोपींमध्ये मनोरंजनाचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मनोरंजन संसद नियमभंगाच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असल्याचा संशय आहे. त्याने इतर आरोपींना समृद्धी, वैभव आणि संपत्तीचे वचन देऊन आणि लोकशाहीचे प्रतीक असलेल्या संसदेला लक्ष्य करून आरोपींना उत्तेजित केल्याचे म्हटले आहे.