१३ डिसेंबरच्या दिवशी म्हणजेच बुधवारी लोकसभेत घुसून दोन तरुणांनी धुराचे लोट पसरवले. २२ वर्षांपूर्वी १३ डिसेंबरच्या दिवशीच संसदेवर हल्ला झाला होता. लष्कर एक तोयबा आणि जैश ए मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला होता. त्याच दिवशी ही घटना घडली. ज्यानंतर एकच गदारोळ झाला. संसदेतल्या खासदारांनी दोन्ही तरुणांना पकडलं आणि सुरक्षा दलांच्या ताब्यात दिलं. सुरक्षा दलांनी त्यांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणात आत्तापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांवर UAPA च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय घडली घटना?

लोकसभेचं कामकाज सुरु होतं. शून्य प्रहर संपण्यासाठी काही मिनिटं उरली होती. त्यावेळी लोकसभेच्या गॅलरीमध्ये बसलेल्या दोन युवकांनी मुख्य भागात उडी मारली. जिथे खासदार बसतात, त्या ठिकाणी त्यांनी उड्या मारुन आपल्या बुटातून स्प्रे काढला आणि धूर पसरवण्यास सुरुवात केली तसंच नारेबाजीही केली. या दोघांनाही खासदारांनी पकडलं आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिलं. आतमध्ये ही घटना घडत असतानाच लोकसभेच्या बाहेर एक महिला आणि एक तरुण या दोघांनीही धूर पसरवत नारेबाजी केली. या महिलेचं नाव नीलम आणि मुलाचं नाव अमोल शिंदे असल्याचं समजतं आहे. या सगळ्या आरोपींवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाणून घ्या आरोपींनी कट कसा आखला?

१) सगळे आरोपी सोशल मीडिया पेज भगत सिंह फॅन क्लबशी जोडले गेले होते. दीड वर्षापूर्वी या सगळ्यांची भेट मैसूर या ठिकाणी जाली होती. नऊ महिन्यांनंतर त्यांची भेट परत झाली. त्यावेळी त्यांनी संसदेत गदारोळ घालण्याचा कट रचला.

२) यावर्षी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी मनोरंजन डी हा आरोपी बंगळुरुतून आला होता. त्याने व्हिजिटर पास घेतला आणि संसदेची रेकी केली होती.

३) जुलै महिन्यात सागर लखनौहून दिल्लीला आला. मात्र त्याला संसद भवनात जाता आलं नव्हतं. त्याने संसदेची बाहेरुन रेकी केली होती.

४) रेकीच्या वेळी मनोरंजन डी ला हे समजलं की संसदेत प्रवेश करताना बूट तपासले जात नाहीत.

५) १० डिसेंबरला हे सगळेजण एक – एक करुन आपल्या राज्यांमधून दिल्लीला आहे. मनोरंजन हा विमानाने दिल्लीला आला.

६) सगळे आरोपी १० डिसेंबरच्या रात्री गुरुग्राम या ठिकाणी विक्की आणि वृंदा यांच्या घरी पोहचले होते. त्यावेळी उशिरा ललित झा हा तरुणही तिथे पोहचला होता.

७) अमोल शिंदे हा तरुण महाराष्ट्रातला आहे. तो महाराष्ट्रातून धूर असलेले फटाके घेऊन आला होता. सागर शर्मा याने १३ डिसेंबरच्या सकाळी ९ वाजता खासदार प्रताप सिन्हा यांच्या स्वीय सचिवाकडून पास मिळवला.

८) सगळे आरोपी इंडिया गेट या ठिकाणी भेटले होते. त्याच ठिकाणी अमोलने सगळ्यांना धुराचे फटाके दिले होते.

९) सागर शर्मा आणि मनोरंजन १३ डिसेंबरच्या दुपारी १२ च्या आसपास संसदेच्या आत गेले.

हे पण वाचा- दोन तरुण लोकसभेत घुसलेले असताना संसदेबाहेर घोषणा देणारी आणि धूर पसरवणारी ती महिला कोण?

१०) अमोल आणि नीलम हे दोघं संसदेच्या बाहेर थांबले आणि त्यांनी घोषणा सुरु केल्या. ललित झा हा त्यांचा व्हिडीओ बनवत होता. सिग्नल नावाच्या अॅपने हे सगळे एकमेकांशी जोडले गेले होते. हंगामा झाल्यानंतर ललित सगळ्यांचे मोबाइल घेऊन फरार झाला.

या प्रकरणात विक्की शर्मा आणि त्याची पत्नी वृ्ंदा यांनाही गुरुग्राम पोलिसांनी अटक केली आहे. ललित झा नावाचा तरुण फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parliament security breach delhi police special cell has registered a case under the uapa section investigation underway scj